मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Sunday, December 28, 2008

॥ गझल ॥




जीव गिळुनी दु:ख, होता कांवला
वेंळ ही नव्हता मराया, ’फांवला’ !

खरडल्या मी, कागदावर वेदना
अर्थ नव्हता अक्षरीं, सामावला !!

नजर, ओंळींच्या ढिगामाजीं फिरे
सूर, गझलेने, न होता लावला

शब्द होते जड, तथापि पोंरके
भाव ही रचनेतला, सुस्तावला !!

तोंच उजळे ज्योत, कुठली अंतरीं !
प्राण, सृजनाच्या सहाय्या, धांवला !!

लेंखणीतुन रक्त, खाली ओंघळें !!!
अन् मला, हा ’शेर’ माझा, भावला !!!!

*************
----- रविशंकर.
२८ डिसेंबर २००८.

Sunday, December 21, 2008

॥ तुकयाचा हंबरडा ॥


मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत तुम्ही आम्ही जात्यातल्या दाण्यासारखे भरडले गेलो... ... ना दळणारा वाली, ना खाणारा.
आपल्यांत साधू अमाप, महात्मे उदंड, पण संत कुणीच नाही.
म्हणून तर इतिहासाची पानं आज उलटी उघडतात.
आणि ’अफझल’ च्या मृत्युदंडास ’शिवबा’ सुद्धां आडवे पडतात.!!
संत तुकाराम हा तमाशा पहायला आज हयात असते, तर काय म्हणाले असते ?

॥ तुकयाचा हंबरडा ॥




वृत्त: ओंवी


हवें होते आम्हां । स्वैर मोकाटपण

दिले तुम्ही दान । स्वातंत्र्याचे ! ॥१॥


सत्तेचाळिस सालीं । ठोंकलेली पांचर

दुखें अनिवार । जीवघेणी ! ॥२॥


तुम्ही जातां, आले । लफंग्यांचे पीक

बसले संस्थानिक । बोकांडीला ॥३॥


नाही तोंडलेल्या । लचक्यांचे वावडे

सोंकावलीं गिधाडें । इंग्रजांनों ॥४॥

’बापूं’ नी दिलेले । ’खादी’ चें व्रत

टगे, निष्ठावन्त । आचरतीं ॥५॥


कुंकवाला धनी । लाभलेंत गुंड

करीतीं अखंड । बलात्कार ॥६॥


भ्रष्ट स्वराज्यात । खातो आम्ही गोळ्या

भाजती हें पोळ्या। चितांवरीं ! ॥७॥


नसे लागू यांना । ’पोटा- मोक्का-टाडा’

हाणा, सोंटा तगडा । पेंकाटांत ! ॥८॥


बळी आज गेले । निष्ठावान पोलीस

उद्याचे ’ओलीस’ । तुम्ही-आम्ही !! ॥९॥


ओंसरीत उभें । वास्तव दाहक

मारूं कुणा हांक? । आकळेना ॥१०॥


लोकशाही, इथे । झाली निर्नायकी

जगायची लायकी । गुलामीत ! ॥११॥


स्वीय करणीचे । फेंडतो हे पाप

असले ’मायबाप’ । दिले देवा ॥१२॥


फोडूं शासनाच्या । माथीं, हे खांपर

चुकवीत आयकर । हिरीरीने !! ॥१३॥


शिकलो आम्हीही । पैसा ओंढाया

कायदे तोडाया । यथाशक्ति ! ॥१४॥


गुदमरतो जीव । शिस्तपालनांत

कश्याशी खातात । नीतिमत्ता ? ॥१५॥


बसविले आम्हीच । निवडून चोर

दरवडेखोर । संसदेंत ॥१६॥


भ्रष्ट जनतेला । भामटे पुढारी

वाली, कोण तारी । रामशास्त्री ? ॥१७॥


होईना निर्मळ । सारवून, अंगण

केली आम्ही घाण । सुखेनैव ! ॥१८॥


बरे होतो आम्ही । नेकीनें चालत

लाथाबुक्क्या खात । पार्श्वभागीं !! ॥१९॥


हुतात्म्यानो, स्वर्गीं। फोडा हंबरडा

वृथा दिला लढा। स्वातंत्र्याचा !!! ॥२०॥

************
---- रविशंकर

९ डिसेंबर २००८

Saturday, December 20, 2008

॥ उधारी ॥



(गझल)

श्मशानांतही संपेना, नीच सावकारी
पसरली न झोंळी ज्याने, मी च तो भिकारी !

बसा, नकां टांकून पळूं, खेंळ जगायाचा
हार-जीत, हातीं फाश्यांच्याच, या जुगारीं !!

तुडवुनी, चढायाची ना वरी, मला आंस
जिंकले कडे त्यांनी, मी धुंडल्या कपारीं

शोंधण्यांस माझा, गांवांतला मागमूस
हिंडलो उन्हांतान्हांत, मी च, भरदुपारीं !!

झळकतीं, जिथें गणिकांच्या, तोंरणें घरांनां

कैफ, त्यां महालीं नाचें, मी रमे भुयारीं !

उगवतात कुठल्या मातीत हे, असे चांफें ?
हुंगतां शिरे नाकीं दुर्गन्ध, ये शिसारी !!

लावली अशी कोणी, ही धार या जिभेला ?
छाटली न मुण्डी, तरिही, सुरी ही, दुधारी !

’बोंल’ म्हणुन तोंड उघडतां, ’पुरे बस्स्’ म्हणतां
डागली कुठे बन्दूक अजुन मी, दुबारी ? !!

गाजल्या वराती, ताशे-ढोंल-लावण्यांच्या
तमाश्यांत तसल्या, फुंकूं काय मी तुतारी ?

असोंत लखलाभ तयांनां, भाट हे शिखण्डी !
मिरविती जरीपटके जें, जीर्ण, घरींदारीं !!

धनी निर्णयांचा जो तो, बेंरकी स्वताच्या
नको पाप तें माथीं, मी फक्त नामधारी

कायदा असा, की माथीं लटकें तलवार !
’न्याय द्यायची शिक्षा’ ! मी जाहलो फरारी !!

ढेंकरांवरीं, आल्या हो किती, ढेंकरा या !
वांढतां न येते, म्हणुनी राहिलो आचारी !!

कडाडून पडतीं कां, या टाळ्यावर टाळ्या ?
रंगले न तोंड, बिचारा मी, म्हणे मदारी !!

केंव्हढी अपूर्वाई, सत्कार हे कश्याला ?
जरा ओंठ शिवले कीं, मी भासतो ’विचारी’ !

सत्य ऐकतांना, पडली घरें काय अंगीं ?
सोंसण्यामुळे पाजळले, शब्द हें, विखारी !!

तख्त लागले ना, बूड मला, टेंकण्याला
कांळजांत वसलो मी, ना जाहलो पुढारी !

सांकडे नकां घांलूं, मी काय उद्धरावें
’पांवणे’ स्वभाव न माझा, मी खरा पुजारी !!

टिपें गाळीता कां आज ? किती हुंदके हे !
पोंट जाळिना की काय, क्षुद्र वांटमारी ?

रुची कडू,’ भिक्षां देहि’ ची, बघा जराशी !
नसे जवळ झोंळी ? घ्या की ’ही’ च, उसनवारी !!!

पाडलें मला मोडून अजवरीं, कितीदां
तरी जगायाची, माझी तांठ, ही उभारी !

घेंतले शिरीं, आयुष्या रे, तुझ्या ऋणाला !!
फिटेनाच मुद्दल ! दे, व्याजांतही उधारी !!!

*************
----- रविशंकर.
२३ डिसेंबर २००८.
॥ दीड शहाणे ॥


(व्यंगोक्ति)

वाहतुकीची ’ ऐशी तैशी ’
करण्यां, शोधूं नवे बहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥धृ॥

’स्कूटी-लूना-डायो’ वरती
लादुन 'पिशव्या-पोरें-पोतीं'
रहदारीला कात्री मारित
’रॅम्बो सर्कस’ करित वहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥१॥

लाल दिवा पाहतांच, गुर्मी
चढतें अंगीं, येते ऊर्मि
नियम कायदें पायीं तुडवित
सिग्नल तोंडुन, सुसांट जाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥२॥

दुकान-गल्ली च्या तोंडावर
आडवीतिडवी लावुन ’पल्सर’
ये-जा करणार्‍यांची तिरपिट
मजेत निरखत उभें रहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥३॥

नसेल सिग्नल अपुला चालूं
फूटपाथवर गाड्या घालूं !!
चाक कुणाच्या पायांवरुनी
गेलें, तें न वळून पहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥४॥

तश्यांत मोबाईल वाजतां
मुळी न, उर्मटपणें, लाजतां
व्यस्तपणा मिरवीत, आंखडत
खांदा-डोंक्यात, ’यंत्र’ पकडत
खेंकड्यापरी गाडी हांकणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥५॥

वाहनावरीं ’जिवलग’ दिसतां
बेंछूटपणा उसळे नुसतां
चिकटत, उजव्या दुभाजकाला
करीत रहदारीचा ’काला’
दुचाक्यांस ठेंवीत समांतर
गप्पा छाटत काटूं अंतर
कोंकलोत मागचे कितीही
मुर्दाडपणे मुळी न हटणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥६॥

वांचवायला इन्धन कणभर
एकमार्गि रस्त्यांचा ’अडसर’
’रागरंग’ ’खाकि’ चा, बघावा
बेशक, पिवळा ’फ्लॅशर’ लावा !
झणीं घुसत उजव्या अंगाला
खुशाल उलटी गाडी घाला !!
चुकून जर ’रणकन्दन’ झाले
बघून घेइल, जो तो अपुले !
जबाबदारी ती सार्‍यांची
माझ्याखेरिज, हे रडगाणे !!!
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥७॥

’गृहस्थ-बाया-पोरेटारे’
कुणी न मागे, वा रे! वा रे !
’सूज्ञ’ करी, 'अज्ञा' ची नक्कल
निर्ढावत, ये नवीन ’अक्कल’
’सखाराम’ ला लावित शेंडी
करीन वाहतुकीची कोंडी !
कुणी, कुणाला जाऊं द्यावे ?
यक्षप्रश्न ! सारेच ’पेशवे’ !!!
म्हणूं, सोंसुनी घांव टाकिचें
’ मी च शहाणा, मूर्ख बाकिचे’ !!!!
व्यर्थ घेतले प्रदीर्घ शिक्षण
करों आमुचे देवच रक्षण
हवी अम्हांला, ’सुरक्षीतता’
मन:पूत ’मोकाट’ वागतां !!
’विद्येच्या माहेरीं’, होते
कशी ’सोय’ ही ? तेंच पहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥८॥

*************************
----- रविशंकर.
३० डिसेंबर २००७.
॥ मी नाही ॥



(गझल)

"गाथा तरेल ऐशी, कीर्ति दिगंत नाही
पैश्यांत लोळणारा, मी 'भाग्यवंत' नाही

निर्लिप्तता च, झालो लेंवून, मी फकीर
काञ्चन्‌मृगाचि धांव, माझ्यापर्यंत नाही !

भरल्या तुडुंब पोंटी, कांठावरी बसून
देण्यास वांझ सल्ले, 'बांका सुमंत' नाही

तुम्हां पचेल काय, वक्तव्य रोखठोक ?
पाठी टवाळणारा, मी 'शीलवंत' नाही.

तुमच्या घरांत तुम्ही, मोठें असाल खूप
ही शिष्ठ आढ्यताच, मजला पसंत नाही

या खांवयास अर्धा, सांगून हक्क घांस
आमंत्रणे दिखाऊ, करण्यास अंत नाही

दॆणे न ज्यांस ठांवे, घेणेंच फक्त पाठ
संबंध त्यां खुज्यांशी, तुटल्यास खंत नाही

मारावयास विंचू , पैजार पाहुण्याची
घेण्यास मी पुणेरी, यजमान 'पंत' नाही !!

खाऊन एक गालीं, दुसरा पुढें कराया
निष्क्रीय नेभळ्यांचा, मी साधुसंत नाही

घालाल घांव जर कां पाठीत, याद राखा !
हलकेंच चांवणारा, मी 'पुष्पदंत' नाही !!

टांकून स्वार्थ ढोंग कोंतेपणा, बघाच
नातें जुळेंल दाट, जें शोंभिवंत नाही

फुलवूं झिजून,मैत्रीच्या, ताटवा फुलांचा
पसरेंल स्नेहगंध, जो नाशवंत नाही

बिनचूक, फक्त म्हणणे तुमचेंच, चूक माझें
वादंग माजवांया, मजला उसंत नाही

चांभार चौकश्या, मी झुरण्यां करूं कश्याला ?
मजला रुचें न कांही, जें जातिवंत नाही !!

पोंटांत एक, दुसरें ओंठांवरीं, न माझ्या
अग्राह्य सत्य मजला, जें मूर्तिमंत नाही

न्यायासनीं बसून, होंण्यास पक्षपाती
विक्रीस तत्वनिष्ठा माझी ज्वलंत, नाही

माझेंवरी करील आरोंप, क्षुद्रतेंचा
ऐसा कुणी महात्मा, सध्या जिवंत नाही !!

तालांसुरांत जेव्हां, न्हातील बोल माझें
भारेंल व्योम सारें, ज्यां आदिअंत नाही" !!

**************
----- रविशंकर.
७ डिसेंबर १९९८


॥ शाल ॥

तारुण्याला ठाउक नव्हते
घडायची होती तंव भेंट
नेहा भिडतां अलगद शिरलो
डोंळ्यातुन काळजांत थेट ॥१॥

क्षणांत एका, पंचविशीने
कशी टाकली न कळे, कात
मैत्रीची व्याख्याच बदलली
रंग जगाला चढले, सात ॥२॥

साध्या साध्या संवादांतुन
ऐकूं आले गुणगुणणें
कधी कधी, बोंलल्यावीणही
तुझे, मला कळले, म्हणणे ॥४॥

नात्याची, ही शाल भरजरी
रुसव्या-फुगव्यांनीं विणली
बेलबुट्टि भरतांना, नाही
हौस तुझी-माझी, शिणली ॥५॥

म्हणोंत कोणी, 'प्रेमवीर', वा
म्हणोत 'वेडे' कुणी, खुशाल
आंतरीक ओढिची, रेशमी
मिरवूं ही अंगावर, शाल ॥६॥

***********
----- रविशंकर.
१८ फेब्रुवारी २००३.
॥ मोरपीस ॥


(गझल)

कुठं काय झालंय्‌ अजून ? पुष्कळ करायचं आहे
इथं कुणा लेकाच्याला, सत्तरीत मरायचं आहे ?

हौशी झाल्या, मौजी केल्या सगळ्या, म्हणून काय झालं ?
पुन्हा एकदा, विशीचं कातडं, पांघरायचं आहे

साहेबाची ऐशी-तैशी, करतां करतां राहून गेली
चाकरीतलं मिंधेपण, एकदां ठोंकरायचं आहे

तसे पांच-दहा हजार, पोष्टांत ठेंवून झालेत, पण
लाखाची नोट बघून, डोकं गरगरायचं आहे

पंचविशीत म्हटलं होतं, " साडी बरी नाही " म्हणून
साठी आली तरी, तेंच झेंगट, निस्तरायचं आहे !!

"झाली एक बस्स्‌ पुरे, डोईजड झाली", म्हणत
मधुबालाबरोंबर, काळीज हरायचं आहे !!

पुढचा जन्म कधी, कुठं, कसला ? कुणांस ठाऊक, पण
उंदिरमामा झालो तरी, हिलाच वरायचं आहे !!

ऊन्ह-पाऊस खाऊन खाऊन, मिश्यासुद्धां पिकल्या, तरी
आठवणींचं फुलपाखरूं, ओंजळीत धरायचं आहे !!

विटीदांडू, गारगोट्या, गलोरीच्या गदाड्यांत
हमरीतुमरीवर येत, खेंळांत उतरायचं आहे

’बाबा आपल्या घराण्यांत 'रविशंकर' कोण झाले' ?
पुढच्या छप्पन्न पिढ्यांनीं, नक्की विचारायचं आहे !!

नुस्ता ’झालो’ की ’जगलो’ ?, काळच ठरवील म्हणा !
वहीमधलं मोरपीस, अजून थंरथंरायचं आहे !!!

**************
----- रविशंकर.
१० ऑगस्ट २००२
॥ ललकारी ॥


(गझल)

जा पंख पसरुनी पोरी, ये फिरून दुनिया सारी
ठेंगणे तुझे आकाश, माराया उंच भरारी

कालवून व्यवहाराचा, भरवितो अनुभवी घांस
जर भुकेंजलीस कुठेंही, येशील कशी माघारी ?

जोडशील सुखदु:खांचे, परदेशी भागीदार
शीक ओंळखाया फक्त, 'राधेय' आणि ’पेंढारी’

सांभाळ स्वतास तुझी तूं, धृतराष्ट्र मी न, मायेचा
द्यायला कवच ही नाही, जन्मदा तुझी, गांधारी

जा करीत पादाक्रांत, शिखरें अक्षय कीर्तीची
पाहण्यांस आतुर डोंळे, तंव झगमगती अंबारी

लांबून तुझा सांगावा, पोंचवील श्रावणवारा
तृप्तिचें दाटतिल मेघ, बरसाया माझ्या दारीं

मोहवी तुला जगताचा, बहुरंगी भूलभुलैय्या
विसरूं नको परी इथल्या, मृद्‍गन्‍धाची ललकारी !!

*************
----- रविशंकर
२३ नोव्हेंबर १९९८
॥ बघतां-बघतां ॥


(व्यंगोक्ति)

सत्तेचाळीस साली इथं, मोठा चमत्कार झाला
सूर्योदयास ग्रहण लागून, बघतां-बघतां अंधार झाला !!

' दे दान सुटें गिराण ', म्हणायचा विकार झाला
तुकडें करून देशाचा, बघतां-बघतां स्वीकार झाला !! ॥१॥

निवडणूक-तमाशाचा फड बहारदार झाला
कुंकवाचा धनीच त्यांत, बघतां-बघतां जार झाला !!

दादा-भाऊंच्या टकरीत, मतदारच ठार झाला
मढ्यांसवें गिधाडांचा, बघतां-बघतां संसार झाला !! ॥२॥

लोंकशाही वर आघाड्यांचा, निर्घृण बलात्कार झाला
बघतां-बघतां स्वराज्याला, वारस भ्रष्टाचार झाला !!

' काय-द्या ' च्या डोंक्यावर, ’अल्-कायदा ' स्वार झाला
बघतां-बघतां पोंटासाठी, नोटांचाच आहार झाला !! ॥३॥

वासें काढून विकायचा, फायदेशीर व्यापार झाला
बघतां-बघतां राजधानीत, चोरांचा दरबार झाला !!

जवानांनाच बत्ती देत, बोफोर्सचा बार झाला !!
पेट्या मोजत शवपेट्यांचा, बघतां-बघतां व्यवहार झाला !! ॥४॥

' बापूं ' नंतर ' लालू ' चाच, इथं जयजयकार झाला
बुद्धाच्या ' विहारा ' चा, बघतां-बघतां ' बिहार ' झाला !!

मुद्रांकांवरचा सिंह, संसदेचीच शिकार झाला
पोलिसांचा बालेकिल्ला, बघतां-बघतां ' तिहार ' झाला !! ॥५॥

रामाच्या सुराज्यांत, रावण तारणहार झाला !
बघतां-बघतां वाल्या कोंळी, ' आमदार-खासदार ' झाला

खाटकाच्या वेशातल्या, कर्णाचा अवतार झाला
पार्थाची गीता ऐकून, गोविन्दा ही गार झाला !!!! ॥६॥

**************
----- रविशंकर
२६ जानेवारी २००१.

Thursday, December 18, 2008

॥ शोध ॥




(गझल)

चोविशीच्या त्या वयाला, सूर होते, गीत होते
डोंलवील अश्रवानांही, असे संगीत होते

तोरणें चोंहीकडे होतीं, विधीने टांगलेली
पायवाटांना सडॆ, साही ऋतूं घालीत होते !!

वाहत्या गर्दीत होतो लगबगीने चाललो मी
योग, होण्याचे दिलाचा खातमा, अघटीत होते !

लागला धक्का जसा, संतापुनी मागे वळालो
दोन डोंळे, काळजाला, बांवरे, वेंधीत होते !!

सांडला खाली, तिच्या हातांतला सारा पसारा
कान बापाचे तिच्या, सोदे-टगे फुंकींत होते

सांवराया, सुन्दरेची मी जशी धरली बखोटी
'यांस खाऊं की गिळूं' ऐसे बघे निरखीत होते !!

मी उभा पुतळ्यापरीं, ती ही जणूं गोंठून गेली
श्वास होते थांबले, डोंके जरा धुन्दीत होते !

घांव झाला तों जिव्हारीं, नी बघे सारे उमजले
जात पुरुषांची कशी, एका क्षणीं त्या, चीत होते !!

"जाऊं द्या, यांची न कांही चूक" जेव्हां ती म्हणाली
पांगतांना, चोंबडे बोटें कशी चांवीत होते !

पाळण्यां उपचार, 'थॅंक्यू', शब्द ओंठांतून आले
भाष्य नेहेचे परी, निःशंक वादातीत होते !!

योग्य 'त्या' देवाणघेंवाणीस नव्हता, तो चव्हाटा
जाहले संवाद जे दोघांत, शब्दातीत होते !

पाठमोरी होंत, ओंशाळून जेव्हां ती पळाली
शोध माझा संपला, पक्के मला माहीत होते !!

ऐकले होते, कुठे पिकल्या कचांचें सूद्न्य बोंल
'हार जें स्वीकारतीं द्वंद्वांत, त्यांची जीत होते' !

राखली ना त्यापुढे, महिनाअखेरीं मी, अधेली
मोगर्‍याचे भाव जेव्हां, यार हो ! तेंजीत होते !!

गांगरून जाहली तिरपीट कैशी सुन्दरेची
आंठवीतां, रोमरोम आजही पुलकीत होते

काय सांगूं यार ! झाली त्या क्षणीं माझी अवस्था
शब्द होतीं पांगळें, बुद्धी जरा कुण्ठीत होते !!!

*************
----- रविशंकर.

२० नोव्हेंबर १९९८
॥ ठंराव ॥



( गझल ) / (व्यंगोक्ति)

" गांठाया कळस ऊर फुटेंतों चढावं
खाली बिल्कुल नाही, जगायला वाव !

शिडीवरी चढण्याची, ज्यांस त्यांस घाई
पिचलो सोंसून अम्ही, नियतीचें घांव ॥१॥

आंधळ्या समाजाचा, आंधळा निवाडा
देतो जो चोर सुळीं, तोंच ठरे सांव !

करी हेंच मूळपुरुष अमुचा, नि:शंक
लुटुन एक दुसर्‍याला करी, कांव कांव !! ॥२॥

कूपमण्डुकांनाही सहजीवन भावें
ऐकाया वेंळ कुणा, तयांची डरॉंव ?

पायतळीं येइल जो, बेलाशक तुडवा !
माणसांपरी, बसतां बघत काय राव ? ॥३॥

घसा कोंरडा करून साधुसंत गेले
'श्मशानांत सरणाचें नकां करूं भाव !'

कळलें नाही त्यांना महत्व, पै पै चें
कलियुगें सुखें त्यांनी, जगुन दाखवावं !! ॥४॥

पचायला जड आम्हां, उपदेश फुकाचा
कुंपण ओंलांडी कां, सरड्याची धांव ?

सुखेनैव स्वर्गांत, देंव झोंपलेला
ऐकूं येईल काय हांक, त्यास 'पाव' ? ॥५॥

वाटें इहलोंक बरा अम्हां, माणसांचा
चिरशांतीची नकोंच, जितेंपणीं हांव !

ऐकलेत ना?, मुकाट अतां चालते व्हा
नाहीतर करूं , हद्दपारिचा ठंराव !!! " ॥६॥

***************
-----रविशंकर.

३ डिसेंबर १९९८

॥ सृजन ॥



इन्द्रधनूंच्या रंगांची, लेंवुनी झळाळी
कल्पना सभोंतीं पिंगा, घालण्यांस आली ॥धृ॥

तालबद्ध-मोहक होते, तिचें पदन्यास
मनोद्न्य विभ्रम डोंळ्यांचें, चित्तचोर खास
अंगांगीं निथळत होंती, कोंवळी नव्हाळी ॥१॥
कल्पना सभोंती पिंगा ...

कलमदान घेंउन बसलो, पान एक कोंरे
प्रियाराधनीं घालून मात्र, येरझारे
वधूपित्यासदृश, फक्त पायपीट झाली ॥२॥
कल्पना सभोंती पिंगा ...

रात्र-रात्र जागुन ऊर्मि, शब्द-शब्द वेंचे
तालसूर कळले होते जरी कन्यकेचे
जुळेना पदन्यासाशीं तिच्या, गीतबोली ॥३॥
कल्पना सभोंती पिंगा ...

सुसूत्रता रुसली, झाला असा निरूपाय
लागले न हांतीं कांही, जाग्रणाशिवाय
अक्षरावली, अर्थाला गंवसणी न घाली ॥३॥
कल्पना सभोंती पिंगा ...

घरीं कष्ट, पारावर नुरे हाहा:कारा
"कोंण 'कल्पना' ही"? ऐसें तणतणून दारा
बाड बांधुनी, माहेरीं रवाना जहाली ॥४॥
कल्पना सभोंती पिंगा ...

तेंल-तूप गेले, हातीं धुपाटणे डोले
आर्जवें करीतां, नाकीं नऊ मात्र आले
शिव्याशाप वेंचक, माझे मला, मीच घाली ॥५॥
कल्पना सभोंती पिंगा ...

शांत रात्र जागुन, विझली दिव्यातली वात
अभिव्यक्तिवावटळीत, उगवली पहांट
फांकतां प्रभा पूर्वेचीं, प्रतिभा अंकुरली ॥६॥
कल्पना सभोंती पिंगा ...

खुणावीत होते मुग्ध, तिचे हाव भाव
मस्तकीं सुरू भुंग्यांचा, शब्द-लपण्डाव
प्रतिभाविष्काराची त्या, माधुरी निराळी ॥७॥
कल्पना सभोंती पिंगा ...

तादात्म तिच्याशीं होतां, मला शुद्ध कोंठें ?
गुंफतीं मुळाक्षरमाळा, भानरहित बोंटें
पकडण्यां गुन्हा, अर्धांगी परतली सकाळीं ॥८॥
कल्पना सभोंती पिंगा ...

लेंखणीतुनीं ओंघळले, सरसरून शब्द
कवितेला गणवृत्तांत, करित शब्दबद्ध
सालंकृत होतां शोंभे, कन्यका निराळी ॥९॥
कल्पना सभोंती पिंगा ...

यथार्थाभिमाना माझ्या, दिला तिने छेद
कळून चुकला होता मज, गद्य-काव्य भेंद
कवितेला, बुद्धि नाही, भावनाच वाली ॥१०॥
कल्पना सभोंती पिंगा ...

*******************
----- रविशंकर
१७ फेब्रुवारी २०००
॥ आता रडा ॥


(व्यंगोक्ति)

(वृत्त: शार्दूलविक्रीडित)

कोणी कांही म्हणोत, या कलियुगीं पैसा खरा ईश्वर
विद्यावैभव-सद्विचार जगवीती देह कां नश्वर ?
गुंडाळून शिरांस लाज, व्यवहारीं वागणे चांगले,
दारिद्र्यांत सुबुद्धिवैभव, हवें कोणांस सांगा भले ? ॥१॥

बुद्धीजीवि जिच्या शिरीं, अकुवतीचे फोंडितीं खांपर
लक्ष्मीच्या घरिं तोंयकुम्भ भरण्याला, शारदा तत्पर
पदव्याही मिळतीं इथें विकत, यें पाण्डित्य सर्वांगिण
पैश्याचे नच सोंग यें वठवितां, श्रीमंत झाल्याविण !! ॥२॥

संभावीतपणांस आचरत, मांडावें तिचे पूजन
लाथाडून तिला, प्रबुद्ध ठरले, निर्बुद्ध-निष्कांचन !!
लागे ना, उपजीविका निभविण्याला, दाम ची रोंकडा ?
ज्याच्या माल खिश्यांत, केंस न कुणी त्याचा करी वांकडा !! ॥३॥

जी विष्णूंस सुगौर भासलि, मनुष्यांना द्विवर्णी दिसे
चाले कां क्षिति बाळगून? इहलोंकीं या, भरावे खिसे !!
कोंणी मध्यमवर्गियांस न पुसे, स्वार्थीच तो कोंरडा
झाला धन्य जगून काटकसरीने जीव? आतां रडा !!! ॥४॥

****************
----- रविशंकर
२४ जुलै २००१
॥ सूर्यास्त ॥




(गझल)

निघेना शब्द ओंठांतून,शंकात्रस्त मी झालो
तुझ्या डोंळ्यातले द्वैत,बघुन अस्वस्थ मी झालो !
भिडेना दृष्टिला माझ्या,तुझी ओंशाळली नेहा
उरींचे ऐकुनी ठोंके तुझ्या,उध्वस्त मी झालो !! ॥१॥

नकों सांगूं ,कुणाच्या बांधली,तूं गांठ,शेंल्याशी
शिसें कानीं न पडतां तप्त तें, मार्गस्थ मी झालो !
जुगारी पट्टिचा आहे, तसा नांवाजलेला मी
पुन्हां तें द्यूत खेंळायास,सिद्धहस्त मी झालो !! ॥२॥

कितीदा फेंकले फांसे,जिवाची लावली बाजी
स्मरूनी 'प्राक्तनीं हरणें',पुरा बिनधास्त मी झालो !
जुन्याची लावुनी चांदी, नव्याचे जिंकले सोने
सुखाच्या पायवाटेचा, खरा पांथस्थ मी झालो !! ॥३॥

नकों तूंही विचारूं,'फुंकला देंहीं, कुणी प्राण?'
कलेंवर हालले चेतून, चिंताग्रस्त मी झालो !
"नशीबीं वाढली कां वंचना?,पुन्हां उरीं फुटणें?"
जशी नेहेत नेहा गुंतली, आश्वस्त मी झालो !! ॥४॥

नितळ त्या,पाहिले डोंळ्यात मी,काळीज धडधडतें
मिळाली पावती निष्ठामयीं, निर्धास्त मी झालो !
सुकूनी रक्त भरल्या, ऐतिहासिक,वाहत्या जखमा
हिच्या ओढाळ स्वप्नांची, जागृत गस्त मी झालो !! ॥५॥

कश्याला आंठवूं तें मौन सूचक,मी तुझें,आतां ?
न उसळे रक्त धमन्यांतून, भारदस्त मी झालो !
नको ढाळूं टिपें, काढून खपली, सांजवेळीं या
तरळणारा,तुझ्या अश्रूंतला, सूर्यास्त मी झालो !! ॥६॥

**************************************
----- रविशंकर
३० ऑगस्ट २००७

Wednesday, December 17, 2008

॥ संधी ॥


आयती चालून आलेली, सोंन्यासारखी संधी होती
हात मारला असता तर, सात पिढ्यांची चांदी होती !
अंतरींच्या आवाजाला, नको तेव्हां पालवी फुटली
तोंडून टाकूं म्हटलं तर, बुडाखालीच फांदी होती !! ॥१॥

'माय मरो मावशी जगो' म्हणणार्‍यांची सद्दी होती
त्यांच्या लेखी, 'द्न्यानेश्वरी न्‌ भगवद्गीता' रद्दी होती
कधीच सांपडणार नाही, पक्के माहित होते तरी
उलट्या सुलट्या विचारांची, डोंक्यांत गुद्दागुद्दी होती !! ॥२॥

गळेकांपू संस्कृतीत, उत्कर्षाची खात्री होती
उंबर्‍याबाहेर तांटकळत उभी, जगद्धात्री होती !
शहाला, काटशह द्यायचाच अवकाश होता
एक टोंचणी अनामिक, सलत गात्रोगात्री होती !! ॥३॥

लोभसपणे खुणावणारी, मादक समृद्धी होती
माझ्यासारख्याकडं कुठं, समर्थांची शुद्धी होती?
कुणीतरी कुर्‍हाड घालून, देहाची खांडोळीं केली
कोंसळतांना कळलं, ती सदसद्‌विवेकबुद्धी होती !!! ॥४॥

*****************
----- रविशंकर
नोव्हेंबर २००७.
॥ सायबर्‌-चॅट्‌ ॥

(व्यंगोक्ति)

विनू ऊर्फ विनायक मोरेश्वर पेंडसें ---
पुण्यनगरी नामक ख्यातकीर्त शहरातल्या ६८९ (जुना) शनवार, असल्या कुठल्यातरी अस्सल्ल गाळीव पुणेरी पत्त्यावर राहणारा इसम. वडील मोरोपंत ऊर्फ अप्पा पेंडसे, गांधीवादी-खादीधारी-स्वातंत्र्यसैनिक-स्वदेशाभिमानी. एकदम सुसंस्कृत, ताठ आणि कडक.

विनोबा दोन खोल्यांच्या वाड्यातल्या घरांत वाढलेले. आयुष्यात कुणालाही चहादेखील न पाजलेले. सायकललाच गाडी म्हणणार्‍या शेंजारांत मुरलेले. अप्पांच्या पोंटी जन्मलेले , पण त्यांच्या वार्‍यालाही न थांबलेले.
असे हे विनोबा ग्रॅज्युएट्‌ झाले, नी एक दिवस कसलासा कॉंप्युटरचा कोर्स आणि जी.आर्‌.ई. करून यू. एस्‌. वेड्यांच्या तांड्यांत सामील होत अमेरिकेस चालते झाले. डॉलरची नोट आणि यू.एस्‌. मधला थाटमाट बघून विनोबांचे डोंळे विस्फारले, आकाशाला हात टेंकले, आणि पाय जमिनीवरून कधी उचलेले गेले, तें त्यांचे त्यांनाच कळले नाही !
'इण्डिया' एकदम फालतू वाटायला लागला. विनोबांचा ’विकी’ झाला. अमेरिका स्वर्गवत्‌ भासूं लागली.

आणि त्याच धुंदीत एकदिवस, त्यांना तीर्थरूप अप्पांशी सायबर्‌-चॅट्‌ करायची दुर्बुद्धी झाली.
विनोबांनी ती. अप्पांशी कसं चॅट्‌ केलं, आणि अप्पांनी विनोबांना 'फाट्‌' करून कसं जमिनीवर आणलं, त्याची ही चित्तरकथा...

******************************************************सायबर्‌-चॅट्‌.

http:\\www.viki@usa.com



ती. अप्पांस,

"कॉम्प्युटर नसेल तर, आंकडेमोड जमत नाही
' पेप्सी-कोक्‌ ' शिवाय, साधी तहानसुद्धां शमत नाही ! '
' टाईट्‌ स्लॅक्स्‌-जीन्स् ‌' खेरीज, दुसरा कपडा रुचत नाही
' हॉट्‌ डॉग्‌-बर्गर ' सारखी, 'पोळी-भाजी' पचत नाही !!

'व्हॅलेंटाइन्‌' कोण होता?, तें कुणांस स्मरत नाही !

'रॉक्‌-पॉप्‌-रॅप्‌ ' शिवाय, गाण्यांत दम उरत नाही !!
' स्टेप कट्‌-बॉब्‌-फ्लिक्स्‌ ', हीच फॅशन खरी आहे.
' पिझ्झा आणि नूडल्स ' वर, ’स्टार्टर’ सुद्धां फ्री आहे !!

' पांचवारी-लेंगा-झब्बा ' शी! कसला वेष आहे !

' रगर्‌ जीन्स्‌-रीबॉक्‌ शूज्‌ ', भारत माझा देश आहे !!
दहा-वीस हजारांत, वरखर्च भागत नाही
समाजाचं आम्ही कांही, देणं-घेणं लागत नाही !!

' देव-धर्म-पूजा-अर्चा? ' गॉड्‌! सगळा त्रास आहे !

' रामा-कृष्णा-वेदा ' यांना, इंपोर्टेड्‌ चा सुवास आहे !!
परदेशी मालाचा दर्जा, स्वदेशीच्या छापांत नाही
'मॉम्‌-डॅड्‌ ' मधलं कल्चर्‌ , देशी ' आई-बापांत ' नाही !!

' गांधी टोंपी-खादी ', सारे पुढा-यांचे चोंचले आहेत

शिक्षण पुरं करतां-करतां, पंचवीस लाख मोजलें आहेत !!
बघाल तिथं खाबूगिरी, जाल तिथं रांग आहे !
सरकार म्हणजे, नागरिकांच्या नानाची टांग्‌ आहे !!!

' इंडिया ' त ढोर मेहनत, ' फास्ट-बक्‌ ' चा बाजा आहे !

' यू एस्‌ ' मधला लुंगासुंगा, च़पराशीही राजा आहे !!
' सिलिकॉन्‌ व्हॅलीत ' तर, श्वासांगणिक छदाम आहे !
' डॉलर ' जिथं नाही, तिथं थांबण्यात काय राम आहे ?

' नॅप्पी-कॅण्डी-कुकी ' शिवाय, इथली पोंरं वाढत नाहीत !

' स्लॅंग्‌ लिंगो ' बोंलेपर्यंत, शाळा वर्ग सोंडत नाहीत !!
' एम्‌.बी.बी.एस्‌.' वाला,साधा डॉक्टर, इथं भेंटत नाही !
'आज्जीबाई' च्या बटव्यानं, सर्दीसुद्धां हटत नाही !!

' क्रेडिट्‌ कार्ड ' खेरीज इथलं, पानसुद्धां हलत नाही !

चार-पांचशे मैल प्रवास, कधी केला, कळत नाही !!
' बर्म्युडा ' चढवली की, कुठं कांही अडत नाही !
' ग्रीन कार्ड ' मिळेंतोंवर, जीव भांड्यात पडत नाही !!

पाच दिवस डॉलर कमवा, दोन दिवस वीक्‌एण्ड्‌ आहे

'लाईफ्‌ एंजॉय्‌ करून घ्या ' हा इथला ट्रेण्ड्‌ आहे !
लाख-दीड लाख पगार, गाडी-घोडा, सगळं आहे !
' यू. एस्‌. ' मधलं 'पॉश्‌ लाईफ़्‌', स्वर्गाइतकं वेगळं आहे !! "
लव्ह्‌
विकी
----------------------------------------------------------------

http:\\www.appa@india.com



चि. विनायकांस,

आम्ही साधे-सुधे पण, माणुसकीचा बाज आहे !
'आज-हायर्‌-उद्यां फायर्‌ ', तुमच्याकडचा रिवाज आहे !!
' नेट्‌-सर्फिंग्‌-चॅट् ‌' खेरिज, तुमचा दिवस ढळत नाही
मातृभाषेमधलं बोलणं, वर्षभरांत कळत नाही !!

रिझॉर्ट्‌-क्लब-पार्ट्यात्‌नं, व्यायाम कांही घडत नाही !

' सॉना-बाथ-फ़ास्टिंग्‌ ' करून, लठ्ठपणा झडत नाही !!
केंरवारे-स्वैपाकाला, तिकडं कमरा वांकत नाहीत !
'पस्तिशितलं म्हातारपण ', ब्यूटी पार्लर झांकत नाहीत !!

सरगांठीच्या विवाहांतच खूष, तिथली नार आहे !

घटस्फोंट घेतां-घेतां, दुसरा पाट तयार आहे !!
असल्य़ा गृहस्थाश्रमांस, आम्ही भीक घालीत नाही !
पांचवारीत ओंवाळणारा जीव, झगेंवालीत नाही !!

' आज चंगळ करून घ्या, उद्यां कुणांस दिसला आहे ? '

कानमंत्र हाच, तुमच्या उरीं-शिरीं ठंसला आहे !!
' गाड्या-घोंडे-बंगला ' सारा, थाट छानच जमला आहे ! '
तुमच्या गुलामगिरीवरच, साहेबाचा इमला आहे !!

' हाय्‌-फाय्‌-सोसायटी ' ची, तिथं चंगळ अमाप आहे !

' काळे-गोरे ' भेंदाबद्दल घृणा वाटणं, पाप आहे !!
' तसला आवाज ' काढायला, तुमची जीभ रेंटत नाही !
' आय्‌-सी-यू ', पडलांत तर, शेंजारीही भेंटत नाही !!

कन्या, इकडं धाडायचा, हुकूम घरांत सुटला असेल !

' बेटिंग-डेटिंग ' तिथलं बघून, पोंटांत गोळा उठला असेल !!
' फाईन्‌ ब्लेण्ड्‌ ' असला तरी, 'स्कॉच्‌' इथं उपरी आहे !
तरण्यातांठ्या लेंकीसाठी, ' पुण्यनगरी 'च बरी आहे !!!

हवं तेव्हां या, इथं कामवाली बाई आहे.

पोरं सांभाळायला, तुझी धट्टीकट्टी आई आहे !!
मन:शांतीसाठी मार्ग, पूर्वेकडंच अमाप आहेत !
' यू. एस्‌. वादी ' पोरांनाही, विचारणारे बाप आहेत !!!

' ऋण काढून सण करा ' तत्वज्ञान आपलं आहे ?

' गांधी टोंपी-खादीनं ' च, आमचं स्वत्व जपलं आहे !!
डॉलरच्या गादित लोंळून, साहेब मात्र चळला आहे !
' रामा-कृष्णा-वेंदा ' म्हणत, पूर्वेकडंच वळला आहे !!

साहेबाची खरी जाण, अजून तुम्हांस झाली नाही ! '

विसरूं नकां ' त्रिशंकूं ' ना, जगांत कुणी वाली नाही !!
विठ्ठलाच्या मूर्तीपेक्षा, अधिक तांठ बडवा असतो !
जातिवंत परक्यांपेक्षा, 'फितुर' ज्यास्त कडवा असतो !!!

तात्पर्य: रट्टा बसायच्या आधीच शुद्धीत याल तर बरें !

तुझे,
अप्पा
******************
----- रविशंकर.
२८ जून २००१.

॥ दंश ॥

॥ दंश ॥



( गझल )

दंश झाला वास्तवाचा, शीर्ष भंजाळून गेले
सोंसलें आघात जे मी, तें मला जाळून गेले !


घेतला होता वसा राजीखुषीनें, विस्तवाचा
अग्निदिव्याला परंतु, प्राण कंटाळून गेले !!


जेंवलो ताटांत एका, काल मी ज्यांच्यासवें, ते
आज भिक्षा वाढुनी, सन्मान हेंटाळून गेले !


केंस ज्यांचे रेशमी, माझा गळा कांपीत होते
धिंड माझी कांढतांना, तेच ओंवाळून गेले !!

जोंवरी मी गप्प होतो, घालुनी ओंठांस टांके
धूतवस्त्रें, धोंरणी परिचीत, डागाळून गेले !


फांडुनी बुरखे तयांचे, टांगली वेंशीस मी जीं
लक्तरें, वैरी पुन्हां, गंगेत खंगाळून गेले !!


षंढ लोकांना बघ्या, होता फुकटचा तो तमाशा

मानभावी सांत्वनाची, तें प्रथा पाळून गेले !


जाब कोंणाला विचारूं ? काढली माझीच साक्ष
वेंचता गाळून शब्द, अर्थ वंगाळून गेले !!


पोंसलेले रक्त-घामाचा सडा घांलून माझ्या

झाड तें, भांगेतल्या तुळशीपरी वांळून गेले !


राहिलीं फांद्यांवरी, नाही म्हणाया चार पाने
सान त्यांची सांवली, पांथस्थही टांळून गेले !!


कांढले नाही तरी मी, स्वत्त्व बाजारीं विकाया

सू‍ज्ञ सौदेबाजही, माझ्यावरी भाळून गेले !


मांडतां लीलांव माझा, ऐकुनी पहिलीच बोंली,
काल जें तोंर्‍यात होंतें, आज ढेंपाळून गेले !!


संपले नव्हते परी, खिजवायला दुर्दैव माझें

बेंरकी दांभीक, माझें सुतकही पाळून गेले !


सोबतीने यातनांच्या, भोंगला वनवास तों मी
सत्यनिष्ठेचे पुकारे, आत्म प्रक्षाळून गेले !!


भक्ष्यवेड्या श्वापदांच्या, चालतां अंधारवाटा

पाय माझें वेंगळीची, वाट चोंखाळून गेले !

फुंकुनी कुरवाळतां, सलते जिव्हारीं खोल घांव
आंसवें माझ्यावरी आकाशही गाळून गेले !!


न्यायदानाला क्षतांच्या कांढता, खपल्या इरेने
वाहत्या रक्तामधे, इतिहास बंबाळून गेले !!

लावली जों चूड मी, विश्वासघाताच्या चितेला

मस्तकीं चंवर्‍या विजांच्या, मेघही ढांळून गेले !


बैसलों ठोंकून मांडी, श्राद्ध घांलाया तयांचें
तर्पणाला तीळ घेतां, पिंड ओंशाळून गेले !!

वेंचुनी सारे निखारे धुमसते, गाथा लिहाया
घेंतली मी लेखणी, अन्‌ शब्द तेंजाळून गेले !!!


***********************
----- रविशंकर.
 जानेवारी १९९९.
॥ खेळिया ॥



डोंळ्यांतलं दंव आतां, गालीं ओंघळत नाही
बाळपण कुठं गेलं? माझं मलाच कळत नाही !! ॥१॥

आंवळ्याचा भाव करून, मी कोहळा उकळत नाही
बायकोचं म्हणणं, मला व्यवहार मुळीच कळत नाही ! ॥२॥

"बाप झाले तरी 'ह्यां'चं, माझ्याशीच जुळत नाही !
सोळा सोमवार केले, पण व्रत कांही फळत नाही" !! ॥३॥

'बायकोपेक्षा मेव्हणी बरी' म्हणत, मी खिदळत नाही
'हि' ची खात्री, सरडा कांही कुंपण तोंडून पळत नाही !! ॥४॥

खाउन पिउन सुखी, पण नोटांची चळत नाही !
एक तारखेवरचं लक्ष्य, तसूंभरही ढळत नाही !! ॥५॥

पोक्त झालेलं रक्त तापतं, पण उसळत नाही
अंगातला वांडपणा, धमन्यांत सळसळत नाही !! ॥६॥

'प्रौढपणा' हाच काय?, नक्की आकळत नाही !
परिपक्वपणाचं, मी दळण कधी दळत नाही !! ॥७॥

जिव्हारीचा घांवसुद्धां, हल्ली भळभळत नाही !
पापड मोडून गेला तरी, गोड बोलणं टळत नाही !! ॥८॥

चेहर्‍यावरचा मुखवटा, मेण असून वितळत नाही !
निरागसपणा आतां, मागूनही मिळत नाही !! ॥९॥

'हूडपणा करूं नये', कळतं, पण वळत नाही
लोकापवादाची जाणीव, स्वप्नांतही छळत नाही !! ॥१०॥

पोरांच्यांत एक बरं, 'फाटतं, पण चिघळत नाही' !
एकदां रड्डी खाल्ली की, भिडूसुद्धा हिंगळत नाही !! ॥११॥

सुंभाचा पीळ, कधी सुखासुखी जळत नाही !!
म्हणून माझ्यापरी कुणी, पोरांटोरांत खेंळत नाही !!! ॥१२॥


****************
---- रविशंकर.
१९ मे २००४.

Monday, December 15, 2008

माझी कविता ॥




वृत्त: ओंवी

चंवळीच्या शेंगेपरी | माझी कविता असावी
पाहतांक्षणीं रेखीव  | छबी, मनांत ठंसावी || ॥१॥

शब्द-शब्द वास्तवाच्या | प्रचीतीनं ओथंबावा
ध्रुवपद येतां कानीं | गुणग्राहक थांबावा  ||   ॥२॥

ओंळ-ओंळ तालावर | वृत्तछंदाच्या, नाचावी
मर्मवेंड्या वाचकानं | अधाश्यापरी वाचावी  || ॥३॥

नखशिखांत कन्यका | अलंकारांनीं सजावी
लुब्ध प्रतिभावन्तांनी | तिची धाटणी पुजावी  || ॥४॥

माझ्या कवितेचा प्राण | तालांसुरांत नहावा
शब्द विसरले तरी | अर्थ चिरंजीव व्हावा  || ॥५॥

माझ्या कवितेंत पीळ | मनाचा, उलगडावा
गुणगुणत तीवर | जीव रसिक जडावा !!  ॥६॥

*******************
  ----- श्रीमति सुधाशंकर
             २३ मार्च २००२.