मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Saturday, December 20, 2008

॥ दीड शहाणे ॥


(व्यंगोक्ति)

वाहतुकीची ’ ऐशी तैशी ’
करण्यां, शोधूं नवे बहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥धृ॥

’स्कूटी-लूना-डायो’ वरती
लादुन 'पिशव्या-पोरें-पोतीं'
रहदारीला कात्री मारित
’रॅम्बो सर्कस’ करित वहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥१॥

लाल दिवा पाहतांच, गुर्मी
चढतें अंगीं, येते ऊर्मि
नियम कायदें पायीं तुडवित
सिग्नल तोंडुन, सुसांट जाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥२॥

दुकान-गल्ली च्या तोंडावर
आडवीतिडवी लावुन ’पल्सर’
ये-जा करणार्‍यांची तिरपिट
मजेत निरखत उभें रहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥३॥

नसेल सिग्नल अपुला चालूं
फूटपाथवर गाड्या घालूं !!
चाक कुणाच्या पायांवरुनी
गेलें, तें न वळून पहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥४॥

तश्यांत मोबाईल वाजतां
मुळी न, उर्मटपणें, लाजतां
व्यस्तपणा मिरवीत, आंखडत
खांदा-डोंक्यात, ’यंत्र’ पकडत
खेंकड्यापरी गाडी हांकणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥५॥

वाहनावरीं ’जिवलग’ दिसतां
बेंछूटपणा उसळे नुसतां
चिकटत, उजव्या दुभाजकाला
करीत रहदारीचा ’काला’
दुचाक्यांस ठेंवीत समांतर
गप्पा छाटत काटूं अंतर
कोंकलोत मागचे कितीही
मुर्दाडपणे मुळी न हटणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥६॥

वांचवायला इन्धन कणभर
एकमार्गि रस्त्यांचा ’अडसर’
’रागरंग’ ’खाकि’ चा, बघावा
बेशक, पिवळा ’फ्लॅशर’ लावा !
झणीं घुसत उजव्या अंगाला
खुशाल उलटी गाडी घाला !!
चुकून जर ’रणकन्दन’ झाले
बघून घेइल, जो तो अपुले !
जबाबदारी ती सार्‍यांची
माझ्याखेरिज, हे रडगाणे !!!
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥७॥

’गृहस्थ-बाया-पोरेटारे’
कुणी न मागे, वा रे! वा रे !
’सूज्ञ’ करी, 'अज्ञा' ची नक्कल
निर्ढावत, ये नवीन ’अक्कल’
’सखाराम’ ला लावित शेंडी
करीन वाहतुकीची कोंडी !
कुणी, कुणाला जाऊं द्यावे ?
यक्षप्रश्न ! सारेच ’पेशवे’ !!!
म्हणूं, सोंसुनी घांव टाकिचें
’ मी च शहाणा, मूर्ख बाकिचे’ !!!!
व्यर्थ घेतले प्रदीर्घ शिक्षण
करों आमुचे देवच रक्षण
हवी अम्हांला, ’सुरक्षीतता’
मन:पूत ’मोकाट’ वागतां !!
’विद्येच्या माहेरीं’, होते
कशी ’सोय’ ही ? तेंच पहाणे
आम्ही नागरिक दीड शहाणे ॥८॥

*************************
----- रविशंकर.
३० डिसेंबर २००७.

No comments:

Post a Comment