मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label ॥ आई ॥. Show all posts
Showing posts with label ॥ आई ॥. Show all posts

Sunday, October 14, 2001

॥ आई ॥



मी ऋणी तुझा, घतलेस तूं जन्मांस
वागवीत उदरीं जडगोळा, नव मास
लाविती शिस्त शाळेत, सैनिकी बाई
शिकविण्यांस 'जगणें' परी, लागते आई !! ॥१॥

कासवीपरी, पोंसलेस दृष्टीनेच
बांधल्यास जखमा, पडतां लागुन ठेंच
देतेस घांस तोंडचा, पिलाला खाया
पाहतां तुज कळें, कश्यास म्हणतीं माया !! ॥२॥

प्रतिरूप आदिशक्तिचेच तूं, अवतारी
तूं ज्यां न लाभली, तो राजाहि भिकारी
लाभण्यां पुन्हां जन्म, हवें सुकृत थोंर
इच्छा पुनश्च व्हायची, तुझाची पोंर !! ॥३॥

पाहतां मांडुनी, जमाखर्च जन्माचा
खर्चांस भागतां, शेष उरो पुण्याचा
जर असेल जगन्नियंता,जड मूर्तीत
रूप तें न दुसरें, तुझ्याविणे, निश्चीत !! ॥४॥

***********
----- रविशंकर
१४ ऑक्टोबर २००१.