मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label ॥फांशी॥. Show all posts
Showing posts with label ॥फांशी॥. Show all posts

Monday, December 8, 2008

॥फांशी॥



(व्यंगोक्ति)

स्वातंत्र्यांत जगायलाच, ’बन्याबापूं’ इतके भ्यायले

बाजारातनं विकत आणून, तडकाफडकीं विष प्यायले!

क्षणार्धात मुंग्या येऊन, हात-पाय गार पडले,
' बन्याबापूं गेले ' म्हणून, सगे-सोयरे रड रडले. ॥१॥

बिनपैश्याच्या तमाश्याला, हां हां म्हणतां गर्दी जमली

जाब-जबाब फिरवतांना, पोलिसांची वर्दी दमली !

मंत्री आले-संत्री आले, चंवकशीची चाकं फिरली

बन्याबापूं जाम खूष! ' मुर्दाडांची खोड जिरली ' !! ॥२॥

मुख्यमंत्र्यांपर्यंत मात्र, अहवाल गेलेच नाहीत !

पंचनाम्यांत नोंद होती, ' बन्याबापूं मेलेच नाहीत ' !!

वर्तमानपत्रांमधली बातमी, साधी सरळ होती

जप्त केलेल्या विषांत, शंभर टक्के भेंसळ होती !! ॥३॥

पुष्कळ गदारोळ होऊन, वार्तापत्रांत मथळा आला

'कलम तीनशे दोन' खाली, न्यायालयांत खटला झाला.

न्यायवैद्यकानं म्हटलं," शास्त्र कुणास डरत नाही.

असलं विष खाऊन, साधा उंदिर सुद्धा मरत नाही " !! ॥४॥

पुराव्याच्या कचाट्यांत, एक पळवाट बरी होती

'माल' नकली असला तरी, 'बाटली' मात्र खरी होती !!

कायद्याचा कीस पाडून, वकील समृध्द झाले !

कोर्टांत खेंटे घालून घालून, बन्याबापूं वृध्द झाले !! ॥५॥

चाळीस वर्षं उलटल्यावर, निकालपत्र जाहीर झाले

'न्याय हवा' म्हणणा-यांचे, दोन्ही कान बधिर झाले !

विक्रेत्याच्या मखलाशीची, बचावात सरशी झाली

आत्महत्यायत्नापायीं, बन्याबापूंस फांशी झाली !!! ॥६॥

अटकपत्र घेऊन जेंव्हां, पोलीस त्यांच्या घरी गेले

बायको-पोरं त्यांना म्हटलीं, " बापूं कधीच वरी गेले !!

जळों तुमची लोंकशाही, मेलेल्याला फांशी देतां ?

खरं सांगा, जितेंपणीच, खांदा द्यायला किती घेतां ? " ॥७॥
********************
----- रविशंकर
१७ ऑगस्ट २००४.