मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label ॥ कांही पटतंय्‌ कां? ॥. Show all posts
Showing posts with label ॥ कांही पटतंय्‌ कां? ॥. Show all posts

Friday, November 14, 2014

॥ कांही पटतंय्‌ कां? ॥




चिंतांनी ग्रासलेलं
तणावांनी त्रासलेलं
’डव्‌’ लावून घांसलेलं
’फेअर-लव्हली’ फासलेलं
’पॉण्ड्स्‌’ नं उजळलेलं
’मस्कार्‍या’ नं पाजळलेलं
’ऍव्हॉन्‌’ नं मढवलेलं
’तनिष्क’ नं जडवलेलं 
आरश्यात डोंकावणारं
रयाहीन गोरंमोरं
’पंचविशी’ तलं आपलंच तोंड
’चाळिशी’ चं वाटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥१॥

’पिझ्झे-बर्गर-केक’ हादडून

पांठी ’हॅवरसॅक’ लदडून
शंभर मीटर पल्ला पिदडून
पाय ओंढत चालतांना
काळीज लंटपटतंय्‌ कां?
बघा...
कांही पटतंय्‌ कां? ॥२॥

घरचं अन्न वर्ज्य करून

’जंक फूड’ पत्करून
दमणुकीशी वैर धंरून
’युनिसेक्स्‌ स्पा’ वरून
भरमसाठ फी भंरून
सॉना बाथ-मालिश करून
उपासमार स्वीकारून
किलोभर वजन तरी 
कायमचं घटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥३॥

’व्हॅलेंटाइन’ च्या वाढदिवशीं

फुगे देऊन  उमललेलं 
’ई-मेल’ वर खुललेलं
’काव्हा कॅफे’ त फुललेलं
’रब्बा’ तर्फे जुळलेलं
पंधरवड्यातच फांटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥४॥

परदेशातल्या ’आय्‌. टी.’ वाल्या

व्हिसा साठी झगडलेल्या
’इंटरनेट’ वर निवडलेल्या
’क्लिक्‌’ सरशी उलगडलेल्या
’डॉलर’ नं लगडलेल्या
जोडीदारावरचं प्रेम
अक्षत पडतांच आटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥५॥

आठवड्याच्या क्लासमध्ये

सारासार विवेक विकून
सूज्ञपणा गहाण टाकून
भाराभर पैसा फेकून
’फाड्‌ फाड्‌ इंग्लिश’ शिकून
चार ओळींचं निर्दोष लेखन
कागदावर उमटतंय्‌ कां?
बघा...
कांही पटतंय्‌ कां? ॥६॥

उच्च शिक्षणाचं घर

आरक्षणं पडल्यावर
दोन गुणांनी हुकल्यावर
निराशेनं थंकल्यावर
’ट्वेण्टी-ट्वेण्टी’ लाथाडून
मतदान करावंसं
मनापासून वाटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥७॥

माहिती म्हणजेच ज्ञान 

अशी गल्लत करून
चिंतनाशी वैर धंरून
’नेट्‌-सर्च’ मारून मारून
विद्वत्सभांत भंरभंरून
दोन मिनिटं बोलायला
तोंड उचकटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥८॥

फक्या मारून दिवसरात्र

परीक्षांची येतां सत्रं
गारठल्यावर सारी गात्रं
पास व्हायचं एकमात्र
’कॉपी पेस्ट’जालिम सूत्र
पावले नाहीत तर मित्र
खरीदलेलं, नाममात्र
पदवी चं प्रमाणपत्र
’मुलाखती’ त वटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥९॥

शिकण्याशी वैर धंरून

कामाला टांग मारून
चकाचक्‌ ’पॉलिश’ करून
नोकरीत मरमरून 
’प्रेझेण्टेशन्स्‌’ तक्ते भंरून
सांगा, मनाला स्मरून
आपला ’पोपट’ झालाय्‌ म्हणून
उरांत दाटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥१०॥

’मल्टिप्लेक्स्‌-मॉल’ वरचा

ठिय्या सोडून दिवसभरचा
साहित्यिक व्याख्यानाला
हरदासाच्या आख्यानाला
कलाकौशल्यं शिकण्याला
गायन-वादन ऐकण्याला
गेला बाजार, वाचनाला
जावंसं वाटतंय्‌ कां?
बघा...
कांही पटतंय्‌ कां? ॥११॥

जर ’सामसुंग’हातातला 

तासभर काढून घेतला
’नोकिया’ सह कानांतला
’हेडफोन’ ही गहाळ केला
’इंटरनेट’ चा लोच्या झाला
’टी. व्ही.’ झाला लोळागोळा
तर तिळपापड होऊन
डोकं तंरकटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥१२॥

’आय. टेन.’ चा तोरा सोडा 

शेंजार्‍याची येतां ’स्कोडा’
उसनं हंसून चंघळत पेढा
मिजाशीचा होउन राडा
असूयेचा उधळत घोडा
मनात खुटखुटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥१३॥

’फेसबुक्‌’ वर ’छबी’ ला

’लाइक्स्‌’ मागून मिळत नाहीत
’सर्कल्स्‌’ कांही जुळत नाहीत
’कॉमेण्ट्स्‌’ तर टळत नाहीत
’फॉलोअर्स’ हिंगळत नाहीत
कारणं मुळीच कळत नाहीत
म्हणून डोकं फुटतंय्‌ कां?
बघा...
कांही पटतंय्‌ कां? ॥१४॥

वीतभर जाड गादीवर

लोळत जाग्रण रात्रभर
तारवटलेली नजर
तंरळणारं डोळाभर
पापण्यांतच विरलं तर
बेदम चंगळवादी 
स्वप्न ’शेख महंमदी’ 
भिरभिरलेलं हताश मन
जगायलाच विटतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥१५॥

लाल दिव्याची ऐशी-तैशी

म्हणत, गाड्या घुसडलेल्या
गल्ली-बोळांत वाढलेल्या
बेफाम जगत बिघडलेल्या
अंगांग ओंरखडलेल्या
चाकांखाली चिरडलेल्या
इस्पितळांत भरडलेल्या
स्ट्रेचर वर पडलेल्या
’सल्लू’ ’ऍश्‌’ चं पोतेरं
कधी परत उठतंय्‌ कां?
बघा... 
कांही पटतंय्‌ कां? ॥१६॥


*******************


--  रविशंकर.

१४ नोव्हेंबर २०१४.