मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label ॥ वास्तव ॥. Show all posts
Showing posts with label ॥ वास्तव ॥. Show all posts

Friday, February 7, 2003

॥ वास्तव ॥


वास्तवाकडं आमचा
एक काणा डोळा आहे
उद्यां काय होईल? म्हणून
पोटांत वायगोळा आहे ॥१॥

वास्तवाकडं कुणी
फिरवलेली पाठ आहे ?
सूद्न्यांच्या कातडीची
जाडी फक्त अचाट आहे ! ॥२॥

वास्तवाच्या उशीवर
आम्ही डोंकं टेंकलं आहे
इथं कुठलं महायुद्ध
अंगावर शेंकलं आहे ? ॥३॥

वास्तवाची ऐशी-तैशी
आम्ही करून टाकली आहे
गुलामांची मर्दुमकी
सोंशिकतेनं झांकली आहे !! ॥४॥

वास्तवापुढं आम्ही
तुकवलेली मान आहे
पोटांवर नकां मारूं
तिथंच आमचा प्राण आहे !! ॥५॥

वास्तवाशी, वास्तविक
आम्ही दोस्ती केली आहे !
कोंडगेपणांत आमची उडी
'गिनीज्‌' बुकांत गेली आहे !! ॥६॥

वास्तवाच्या, एतद्देशीं
कल्पनाच वेड्या आहेत
उगीच काय हातांपायांत
लोंकशाहीच्या बेंड्या आहेत ? ॥७॥

***********
----- रविशंकर.
७ फेब्रुवारी २००३.