मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label सोंहळा. Show all posts
Showing posts with label सोंहळा. Show all posts

Saturday, December 13, 2008

॥ सोंहळा ॥



वर्षवत जलधारा, आला श्रावण, श्रावण
वसुंधरेच्या लग्नाचं, स्वीकारा हो आवतण
धरा नेसली, पांचूंचा शालू हिरवा, हिरवा
मन-उद्यांनीं सृष्टिच्या, घुमे मंजुळ पारवा ॥१॥

झाडझाडोर्‍याला कांती, आला बहर, बहर
श्रावणांत रोज हाच उत्सव, तिन्हीं प्रहर
छप्परावरी वाजवी ताशा, पाऊस, पाऊस
पीकपाणी जोंपासाया सिद्ध, मृत्तिकेची कूस ॥२॥

कार्य न्यायला सिद्धीस, श्री च समर्थ, समर्थ
जाई-जुई-मोगर्‍याच्या, घमघमाटाची शर्थ
नको न्याया पुष्पगुच्छ, नको आहेर, आहेर
फेंडा पारणं डोंळ्यांचं, जरा पडून बाहेर ॥३॥

नव्या नव्हाळीनं गेली, वधू लाजून, लाजून
रानांवनांतून छेडी वारा, सनईची धून
आभाळ घुमट भव्य, झालं मांडव, मांडव
आलं-गेलं स्वागताला, करी वादळ ताण्डव ॥४॥

सोनसळी मुण्डावळ्या, रविकिरण, किरण
ढगांमागं उतावीळ उभा, सूर्यनारायण
मंगलाष्टाकं आळवी, वारा बेभान, बेभान
कडाडात गर्जे वीज, 'सुमंगल सावधान' ॥५॥

आंतरपाट ढगांचा ढळे, चंदेरी, चंदेरी
प्रभा झळाळे, वराच्या अंगकांतिची, सोनेरी
रंगीबेरंगी अक्षत, वर्षातुषार, तुषार
पडे धरित्रीच्या कण्ठीं, इन्द्रधनुष्याचा हार ॥६॥

क्षितिजावरीं लग्नाचं, सजे बोहलं, बोहलं
थाटमाट अवाढव्य, मन बघून मोहलं
सप्तपदीला वर्‍हाडी, कृष्णमेघ झाले गोळा
कृतार्थ नभ लेंकीचा पाहे, विवाह सोंहळा !! ॥७॥

************
----- रविशंकर

१४ जुलै २००१.