मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.
Showing posts with label ॥ बघतां-बघतां ॥. Show all posts
Showing posts with label ॥ बघतां-बघतां ॥. Show all posts

Saturday, December 20, 2008

॥ बघतां-बघतां ॥


(व्यंगोक्ति)

सत्तेचाळीस साली इथं, मोठा चमत्कार झाला
सूर्योदयास ग्रहण लागून, बघतां-बघतां अंधार झाला !!

' दे दान सुटें गिराण ', म्हणायचा विकार झाला
तुकडें करून देशाचा, बघतां-बघतां स्वीकार झाला !! ॥१॥

निवडणूक-तमाशाचा फड बहारदार झाला
कुंकवाचा धनीच त्यांत, बघतां-बघतां जार झाला !!

दादा-भाऊंच्या टकरीत, मतदारच ठार झाला
मढ्यांसवें गिधाडांचा, बघतां-बघतां संसार झाला !! ॥२॥

लोंकशाही वर आघाड्यांचा, निर्घृण बलात्कार झाला
बघतां-बघतां स्वराज्याला, वारस भ्रष्टाचार झाला !!

' काय-द्या ' च्या डोंक्यावर, ’अल्-कायदा ' स्वार झाला
बघतां-बघतां पोंटासाठी, नोटांचाच आहार झाला !! ॥३॥

वासें काढून विकायचा, फायदेशीर व्यापार झाला
बघतां-बघतां राजधानीत, चोरांचा दरबार झाला !!

जवानांनाच बत्ती देत, बोफोर्सचा बार झाला !!
पेट्या मोजत शवपेट्यांचा, बघतां-बघतां व्यवहार झाला !! ॥४॥

' बापूं ' नंतर ' लालू ' चाच, इथं जयजयकार झाला
बुद्धाच्या ' विहारा ' चा, बघतां-बघतां ' बिहार ' झाला !!

मुद्रांकांवरचा सिंह, संसदेचीच शिकार झाला
पोलिसांचा बालेकिल्ला, बघतां-बघतां ' तिहार ' झाला !! ॥५॥

रामाच्या सुराज्यांत, रावण तारणहार झाला !
बघतां-बघतां वाल्या कोंळी, ' आमदार-खासदार ' झाला

खाटकाच्या वेशातल्या, कर्णाचा अवतार झाला
पार्थाची गीता ऐकून, गोविन्दा ही गार झाला !!!! ॥६॥

**************
----- रविशंकर
२६ जानेवारी २००१.