मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Saturday, December 20, 2008

॥ ललकारी ॥


(गझल)

जा पंख पसरुनी पोरी, ये फिरून दुनिया सारी
ठेंगणे तुझे आकाश, माराया उंच भरारी

कालवून व्यवहाराचा, भरवितो अनुभवी घांस
जर भुकेंजलीस कुठेंही, येशील कशी माघारी ?

जोडशील सुखदु:खांचे, परदेशी भागीदार
शीक ओंळखाया फक्त, 'राधेय' आणि ’पेंढारी’

सांभाळ स्वतास तुझी तूं, धृतराष्ट्र मी न, मायेचा
द्यायला कवच ही नाही, जन्मदा तुझी, गांधारी

जा करीत पादाक्रांत, शिखरें अक्षय कीर्तीची
पाहण्यांस आतुर डोंळे, तंव झगमगती अंबारी

लांबून तुझा सांगावा, पोंचवील श्रावणवारा
तृप्तिचें दाटतिल मेघ, बरसाया माझ्या दारीं

मोहवी तुला जगताचा, बहुरंगी भूलभुलैय्या
विसरूं नको परी इथल्या, मृद्‍गन्‍धाची ललकारी !!

*************
----- रविशंकर
२३ नोव्हेंबर १९९८

No comments:

Post a Comment