मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत तुम्ही आम्ही जात्यातल्या दाण्यासारखे भरडले गेलो... ... ना दळणारा वाली, ना खाणारा.
आपल्यांत साधू अमाप, महात्मे उदंड, पण संत कुणीच नाही.
म्हणून तर इतिहासाची पानं आज उलटी उघडतात.
आणि ’अफझल’ च्या मृत्युदंडास ’शिवबा’ सुद्धां आडवे पडतात.!!
संत तुकाराम हा तमाशा पहायला आज हयात असते, तर काय म्हणाले असते ?
॥ तुकयाचा हंबरडा ॥
वृत्त: ओंवी
हवें होते आम्हां । स्वैर मोकाटपण
दिले तुम्ही दान । स्वातंत्र्याचे ! ॥१॥
सत्तेचाळिस सालीं । ठोंकलेली पांचर
दुखें अनिवार । जीवघेणी ! ॥२॥
तुम्ही जातां, आले । लफंग्यांचे पीक
बसले संस्थानिक । बोकांडीला ॥३॥
नाही तोंडलेल्या । लचक्यांचे वावडे
सोंकावलीं गिधाडें । इंग्रजांनों ॥४॥
’बापूं’ नी दिलेले । ’खादी’ चें व्रत
टगे, निष्ठावन्त । आचरतीं ॥५॥
कुंकवाला धनी । लाभलेंत गुंड
करीतीं अखंड । बलात्कार ॥६॥
भ्रष्ट स्वराज्यात । खातो आम्ही गोळ्या
भाजती हें पोळ्या। चितांवरीं ! ॥७॥
नसे लागू यांना । ’पोटा- मोक्का-टाडा’
हाणा, सोंटा तगडा । पेंकाटांत ! ॥८॥
बळी आज गेले । निष्ठावान पोलीस
उद्याचे ’ओलीस’ । तुम्ही-आम्ही !! ॥९॥
ओंसरीत उभें । वास्तव दाहक
मारूं कुणा हांक? । आकळेना ॥१०॥
लोकशाही, इथे । झाली निर्नायकी
जगायची लायकी । गुलामीत ! ॥११॥
स्वीय करणीचे । फेंडतो हे पाप
असले ’मायबाप’ । दिले देवा ॥१२॥
फोडूं शासनाच्या । माथीं, हे खांपर
चुकवीत आयकर । हिरीरीने !! ॥१३॥
शिकलो आम्हीही । पैसा ओंढाया
कायदे तोडाया । यथाशक्ति ! ॥१४॥
गुदमरतो जीव । शिस्तपालनांत
कश्याशी खातात । नीतिमत्ता ? ॥१५॥
बसविले आम्हीच । निवडून चोर
दरवडेखोर । संसदेंत ॥१६॥
भ्रष्ट जनतेला । भामटे पुढारी
वाली, कोण तारी । रामशास्त्री ? ॥१७॥
होईना निर्मळ । सारवून, अंगण
केली आम्ही घाण । सुखेनैव ! ॥१८॥
बरे होतो आम्ही । नेकीनें चालत
लाथाबुक्क्या खात । पार्श्वभागीं !! ॥१९॥
हुतात्म्यानो, स्वर्गीं। फोडा हंबरडा
वृथा दिला लढा। स्वातंत्र्याचा !!! ॥२०॥
************
---- रविशंकर
९ डिसेंबर २००८
No comments:
Post a Comment