मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Wednesday, December 20, 2017

॥ पुनश्च हरि ॐ ॥


॥ पुनश्च हरि ॐ ॥
[ गझल ]




रांगतां पाय अडकून, मी पडावयाला शिकलो
पाऊल टांकतां पहिले, धंडपडावयाला शिकलो ॥
 

श्रीमुखांत हाणली जेव्हां, भंडकून जन्मदात्यांनीं
चोंळीत गाल, त्यापुढतीं, मी घडावयाला शिकलो ॥
 

पांठीला तुटके दोर, नी दरी खोंल सामोरी
दिसतांना, शिखर निसरडे, मी चंढावयाला शिकलो ॥
 

सर्कशीत या जगण्याच्या, पापण्यांत रोंधुन पाणी
नरड्यात गिळून आवंढा, मी रडावयाला शिकलो !! ॥
 

संकटें घेंरतां, फंसव्या-भाबड्या-खुळ्या आशेचा
एक पंख तुटुनी गळतां, मी उडावयाला शिकलो !! ॥
 

सरतां पायातिल त्राण, कंठाशी येतां प्राण
परजून खड्ग, नियतीशी, मी लढावयाला शिकलो ॥
 

तारण्यास गलबत, जेव्हां जाहला मिळेना त्राता
वादळास, वल्हवित होडी, मी भिडावयाला शिकलो ॥
 

तरण्याची नुरतां आशा, बुडण्याची पटतां खात्री
आव्हान देत दैवाला, मी बुडावयाला शिकलो...!! ॥
 

ग्रीष्मात शीत छाया दे, जी आप्त-स्वकीय-परांना
त्या हरित पालवीसाठी, मी झंडावयाला शिकलो ॥
 

सांजेच्या कांरतवेळीं, उधळतीं गंध अंधारीं
ज्या कळ्या रातराणीच्या, मी खुडावयाला शिकलो ...!!! ॥


जगतांना शिकतां शिकतां, शिकणे च जाहले जगणे
साठी त धडा जन्माचा, हादडावयाला शिकलो  ।।

नागड्या स्वार्थवस्त्रांना, भिरकावुन होतां बंब्या
सत्तरीत, आज  पुन्हां मी, दुडदुडावयाला शिकलो...!!  ।।

अन् पुन्हां पाय अडकून, मी पडावयाला शिकलो... !!!

**************************************************************


-- रविशंकर
    डिसेंबर २०, २०१७.



                      




No comments:

Post a Comment