मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Wednesday, December 28, 2016

॥ काल - आज ॥


॥ काल - आज ॥

॥ काल 

वृत्त: भुजंगप्रयात

|| प्रमाणामधे सर्व काही असावे ||




अतीकोपता कार्य जाते  लयाला, 
अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती लोभ आणी जना नित्य लाज,
अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, 
अती काळजी टाकणे हेही खूळ 
सदा चित्त हे सद्विचारे कसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया,
अती खेळणे हा भिकेचाच पाया 
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती दान तेही प्रपंचात छिद्र, 
अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र 
बरे कोणते ते मनाला पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती भोजने रोग येतो घराला, 
उपासे अती कष्ट होती नराला 
फुका सांग देवावरी का रुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, 
अती द्वेष भूलोकीचे पंककुंड 
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती आळशी वाचुनी प्रेतरूप, 
अती झोप घे तोही त्याचाच भूप 
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती द्रव्यही जोडते पापरास, 
अती घोर दारिद्य्र तो पंकवास 
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती वाद घेता दुरावेल सत्य, 
अती `होस हो' बोलणे नीचकृत्य
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती औषधे वाढवितात रोग, 
उपेक्षा अती आणते सर्व भोग 
हिताच्या उपायास कां आळसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती दाट वस्तीत नाना उपाधी, 
अती शून्य रानात औदास्य बाधी 
लघुग्राम पाहून तेथे वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, 
अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी 
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, 
अती थाट तो वेष होतो नटाचा 
रहावे असे की न कोणी हसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती भांडणे नाश तो यादवांचा, 
हठाने अती वंश ना कौरवांचा 
कराया अती हे न कोणी वसावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, 
कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ 
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, 
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी 
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, 
सदा गद्य वाचोनियां त्रास होतो 
कधी ते कधी हेही वाचीत जावे,
प्रमाणामधे सर्व काही असावे 

***********************************

                                                               -- हितोपदेश

                             प्रत्युत्तर -   ॥ आज ॥

                                             वृत्त: भुजंगप्रयात

॥ जिणे छानछोकीत बेदम, असावे ॥




आगाऊ निरुद्योगि ह्या टोणग्याला
धनाची, कळेनाच जादू जयाला
'कहावा' त उडवीत पैसा, बसावे !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

लिहावी लिपी 'स्लॅंग् इंग्लीश' फाडू
कपाळीं स्वहस्तेंच मारून झाडू
सौभाग्य-मांगल्य कुंकू पुसावे !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

मिळे 'आय. पी. ओ.' त पैसा, फुकटचा
हवा व्यर्थ कोणास सल्ला विकतचा?
हमालीस 'आय. टी.' त सारे घुसावे !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

कुणी पाहिलाहे 'उद्या' काय सांगा?
करा बंद तात्काळ 'उपदेश भोंगा'
स्वतः भक्षिण्यालाच गाजर खिसावे !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

जहालीच बेवारशी पांचवारी
मजा फांटक्या पाटलोणीत न्यारी
पटे हें च आम्हां, तुम्ही कां रुसावे? !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

तुम्हांलाच लखलाभ पूजा नि पाठ
बरे, चंगळीचेच भरगच्च ताट
'तथास्तु' म्हणोनी फिरंगी हंसावे !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

हव्या येथ कोणास गणगोत खाणी?
जगीं आमुच्या, बोलतीं फक्त नाणी
कमाईत वाटे कुणाचे नसावे !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

इथे ची खरा लागतो सोक्ष-मोक्ष
तुम्ही पाहिला काय हो स्वर्ग-मोक्ष?
कुणी, आई-बापास ऐसे पुसावे? !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

रुचें पश्चिमेचाच आम्हांस वारा
नको जाहला बंधनांचा पसारा
शिरीं फक्त दायित्त्व कुठले नसावे !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

असे मांडली आग्रही बंडखोरी
इथे, सुप्त इच्छा वदायास चोरी
फिरंग्यांस 'आदर्श' आम्ही दिसावे !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे...

कश्याला हवे लग्न? पायांत बेडी
अम्हां आत्मकेन्द्री च जगण्यांत गोडी
अपत्यांस प्रसवून कोणी फंसावे? !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे... 

इथे होतसे आमुचा कोंडमारा
न, लग्नाविणे साहचर्यास थारा
कुणी पारतंत्र्यांत असल्या, वसावे? !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे !!  

अम्हां वावडे 'भारतीयत्त्व' आज
चुकीच्या स्थळीं जन्मल्याचीच लाज
विमानांत 'टा टा' करूनी बसावे !!
जिणे छानछोकीत बेदम, असावे...

********************************

                                                                --रविशंकर.
                                                       २८ डिसेंबर २०१६


No comments:

Post a Comment