मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Tuesday, January 7, 2020

।। द्यूत ।।

।। द्यूत ।।
(गझल)


खेळ द्यूताचा च पूर्वापार आहे 
पांच वर्षांचा रिवाज—करार आहे
हा मवाली, गुंड तो, बाकी लफंगे  !!
धर्म सार्‍यांचाच भ्रष्टाचार आहे   ॥१॥

दान पाडावें कसे? फाश्यांस न कळे
या ठगा चा तो टग्या ही यार आहे  !!
लागते सारे हडपलेले, पणाला
हडपण्यासाठी पुनश्च, जुगार आहे   ॥ २ ॥

हा खरा? की तो बरा? कांही कळे ना
धर्म कां? दुर्योधनहि दिलदार आहे  !!
कालचे सोदे, अतां राजे  जहाले
आजचा सोद्या च जामिनदार आहे !!॥३॥

बसविले सिंहासनीं अगदी कुणांही
सुस्त नोकरशाहिचा दरबार आहे !
गर्जना—आश्वासनांचा  लोट—धुरळा
सूर्य डोक्यांवर, तरी अंधार आहे  !! ॥ ४ ॥

आंधळा धृतराष्ट्र पुसतो," संजया रे
कां तुझ्या नजरेपुढे अपहार आहे? "
उत्तरे संजय," खरे भगवन्त जाणे !!
रुष्ट घोड्यांचा, खुला बाजार आहे  !! ॥ ५ ॥

द्यूत संपे ना, उलटलीं साठ वर्षें
करीं सत्तासुंदरीच्या, हार आहे
शेंवटीं, धर्मी—अधर्मी एक सारे
राजकोषाची सखी गुलजार आहे  !! ॥६ ॥

द्यूत उफराटे असे, या कलियुगाचे
हा च द्यूताचा नवा अवतार आहे
जिंकितीं धर्मी—अधर्मी, द्यूतकर्मी
फक्त, जनतेच्या नशीबीं हार आहे  !!! ॥७॥

याज्ञसेनी ला, न तारणहार कोणी
वस्त्रहरणाच्या क्षणीं च, पसार आहे !!
खेंचतां कच फंरपटे, जी द्रौपदी, ती
द्रौपदी नाहीच, तो मतदार आहे  !!! ॥८॥

_________________
रविशंकर.
१८ डिसेंबर २०१९

No comments:

Post a Comment