वृत्त: ओवी
धन हेच साधन । धन ची प्रसाधन
करंटा तो निर्धन । भारत देशीं ॥
पैसा ही च शक्ति । पैश्याठांयीं भक्ति
पैश्यानेच मुक्ति । मिळे येथ ॥
जगायाला पैसा । तगायला पैसा
भोगायला पैसा । अनिवार्य ॥
’तडीपार’, झाले । पिढ्यांचे आदर्श
सर्वांगीण उत्कर्ष । किती दूर ? ॥
माथ्यावरी हात । ’दादां’ चा वायदा
कुठला हो कायदा । आम्हां लागूं ? ॥
मार्गदर्शनाला । भेंटलेत ’भाऊ’
किती पैसा खाऊं ? । फुटे पोंट ! ॥
कंठीं शोभे आतां । नोटांचाच हार
सोंसवे आहार | पैश्याचाच ॥
मागे, लाभलेला । अजगराचा घसा
गिळायला पैसा । निरंतर !! ॥
उदरीं अशांती । अजीर्णाची भ्रान्ती
पैश्याचीच वान्ती । होतें काय ?॥
जीवाला घरघर । चित्त न थार्यावर
सोडी कधी वार्यावर । ’दादा’-’भाऊ’ ? ॥
सांपडून सडलो । जर कारागृहीं
बायको तरी ही । ओंळखेल ? ॥
ज्यांसाठी मांडली । नीच वाटमारी
ती पोंरें तरी । घेतिल धांव ? ॥
कुणां ’नवरा’-’बाप’ । ’बदनाम’, हंवासा
बुडाखाली पैसा । असतांना ? ॥
जेव्हांचे तेव्हां । सारे बघून घेऊं
सध्या तर खाऊं । बक्कळ पैसा !! ॥
अर्थार्जनापायीं । अनर्थाचा शोंध
ऐसा ’अर्थबोध’ । माझ्या देंशीं !! ॥
द्या खुशाल लाख । वांझ शिव्याशाप
आम्हां मायबाप । अनोळखी !! ॥
*********************
----- रविशंकर.
८ ऑगस्ट २०१०.
No comments:
Post a Comment