महाभारत हा आपला राष्ट्रीय ग्रंथ.
माणसाचं अवघं आयुष्य सार्थ किंवा अर्थहीन कश्यामुळं होतं, याचं तत्त्वद्न्यान इतक्या समर्थपणानं माण्डणारा ग्रंथराज, जगाच्या इतिहासात दुसरा झाला नसेल. आपण ज्यांना शाश्वत जीवनमूल्य म्हणतो, ती पानोपानीं विखुरलेला हा ग्रंथ, जन्मांत एकदातरी वाचावा इतका समृद्ध आहे.
इतका समृद्ध आहे, की आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धां, एकटे अण्णा हजारे सबंध भारत सरकार कसे काय वांकवूं शकतात, आणि एकशे दहा कोटी जनतेला असे कोणी अण्णा हजारे कधी अवतराय्त याची पन्नास वर्षं अगतिकपणे कश्यामुळं वाट बघत बसावं लागतंय्, ह्याचं अचूक उत्तरही या महाभारतातच सापडतं.
पण गम्मत अशी आहे की, महाभारतांतल्या विलक्षण विरोधाभासी कथांतनं ही शाश्वत जीवनमूल्यं शोंधावी लागतात. म्हणूनच महाभारतावर आजतागायत पण्डितांत वादविवाद चालत आलेले आहेत, आणि पुढंही होत राहतील. सर्वसामान्यांना महाभारत हे आदिपर्वापासून युद्धपर्वापर्यन्तच [ भगवद्गीता हा ह्या युद्धपर्वाचाच एक भाग आहे.] परिचित असतं. पण महाभारत वाचतांना माझ्या असं ध्यानांत आलं की त्यातलं त्रिकालाबाधित तत्त्वद्न्यान, हे त्यानंतरच्या पर्वांतच --( स्त्रीपर्व, विलापपर्व, निर्वाणपर्व इ.), सुस्पष्ट होत जातं. सामान्य भावुक हरिभक्तांनां ही पर्व फारशी रुचत-पचत नाहीत, म्हणून ती फक्त अभ्यासकांपुरतीच मर्यादित राहिली आहेत.
मला आमचे टिकेकर मास्तर नेहमी म्हणायचे की ’ विशुद्ध निष्कलंक चारित्र्याची ढाल, आणि स्वत्त्वाची पाजळलेली तलवार परजत, किडमिड्या जरी मैदानांत उतरला, तरी भल्या भल्या हिन्दकेसरींवरही मैदान सोडून पळ काढायची वेळ येते’.
ह्या शाश्वत जीवनमूल्याचे अनुभव मीही कैकवेळा घेतलेले आहेत.
ही दोन अमोघ शस्त्रं कपटाचरणानं बोथट झाली, तर माणसांचंच काय प्रत्यक्ष भगवन्ताचंही काय होतं, ते स्त्रीपर्व वाचलं की लख्खपणे समजतं.
संपूर्ण महाभारतभर अशी कैक जीवनमूल्यं लेवून तंळपणार्या, त्यातल्या प्रत्येक अधःपतित व्यक्तीची कसलीही भीडभाड न ठेंवतां तिला जाहीरपणे निर्भर्त्सनेच्या आंसुडानं कोंरडे ओंढणार्या, साक्षात् शक्तिस्वरूपा म्हणतां येईल, अश्या आभाळमयी गान्धारीपुढं झाडाझडती द्यायची जेव्हां कृष्णावर वेंळ आली, तेव्हां त्या प्रत्यक्ष भगवन्ताचंही काय झालं हे बघणं म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे. व्यासमहर्षींची असामान्य प्रतिभा ह्या प्रसंगात शिगेला पोंचलेली दिसते.
यच्चयावत जीवनमूल्यांवर असलेल्या स्वतःच्या अभंग निष्ठांचं महावस्त्र लेंवून सबंध महाभारतभर तंळपणार्या या गांधारीनं पुढ्यांत उभ्या असलेल्या भगवन्ताच्या एकेक कृष्णकृत्यांवर अचूक बोंट ठेवत, तत्संबंधित शाश्वत धर्ममूल्यांचे निरपवाद दाखले देत, त्यानंच गीतेच्या अठरा अध्यायांत सांगितलेल्या धर्माधर्मसूक्तांच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. आणि परमेश्वराच्या त्या आठव्या अवतारावरही निरुत्तर होत, त्या तपस्विनीनं आपल्या तेजस्वी वाणीनं लिहिलेला स्वतःचा ललाटलेख मुकाट पत्करायची अन् भोगायची वेळ आली.
मूळ संस्कृतातलं महाभारत तसं उमजायला कठीण. पण हा प्रसंग गेली कैक वर्षं माझ्या डोंक्यांत ठाण माण्डून बसलेला होता. जसा जमेल तसा, तो सुगम मराठीत शब्दबद्ध करायची धडपड चाललेली होती. अखेर तो कागदावर उतरला.
हाच वेंचा खाली उधृत केलेला आहे. माझ्या आवडत्या शिखरिणी वृत्तांत तो कसाबसा बसवायला, मला फक्त साडेपांच वर्षं लागली.!!
असामान्य प्रतिभेचा आविष्कार शब्दबद्ध करायचा नस्ता उद्योग करायला सामान्य माणूस गेला, की त्याचं काय होतं, हे कळायला एव्हढं सांगणं पुरेसं ठरावं.
************************************
॥ कृष्णाची झाडाझडती ॥
कडाडे गान्धारी, पुसत यदुनाथास, सरळ
उभा जो निःशब्द पुढति, अन् कांपे चंळचंळ !!
"कसा धर्मोद्घोष तंव, कपटकृत्यांत फंसला?
करी तें ची माते विशद, कि तुझा कण्ठ बसला ? !!!
पुनःपुन्हां ग्लानी चढुन करि ज्याला, हतबल
तळी कापट्याची उचलि, तंव जो धर्म, विकल !!
करी मर्त्यांनां, भ्रष्ट नि पतितही, धर्मसमरीं
तुलाही पाडी भाग अवतरण्याला क्षितिवरी !!!
स्वभार्येचाही लावित पण, युधिष्ठीर सुटला
कसा, त्याचा धिक्कार न, तंव मुखाने प्रकटला?!!
निघाली स्त्रीत्त्वाचीहि भर दरबारीं, फरपट
जहाले होते त्याक्षणिंच, कुरु-पण्डूकुल मृत !!!
शिखण्डीच्या आड दडुन शर मारी, भट भला !
गुरूचाही निःशस्त्र, वध करि, कौंतेय दुबळा !!
वधी कर्णाला शस्त्रविहिन,रथारूढ नसतां
बघे तें ही, धर्म हतबल तुझा, काय नुसता?!!!
शवांचे रक्तप्राशन करविते, जी, घटघट
द्विपादांनांही पोंचवि पशुगतीला, झटपट
पशूवृत्ती ती जागवि, वद मला, धर्म कुठला?
सुटे भीमाचा तोंल, तंवहि कसा काय सुटला?!!!
कुरू योद्धे, मृत्यू कवळुन, खरा धर्म जगले
अतां कां जेते पाण्डवहि, जगण्याला उबगले?!!
अधर्माची गीता पढवुन तयां, धर्मसमरीं
तुवां नेले, त्यां बोंट धंरुन विनाशाप्रति, हरी !!!
बरे, उच्छेदीलेस समरिं अधर्मी कौरव
सदाचारी, नेलेस अधमगतीला, पाण्डव !!
विपर्यासी धर्मार्थ परिसुन, कौन्तेय चळला
खरा धर्माधर्म, तुज तरि असे काय कळला?!!!
मढी मेलेली झुंजविलिस, करोनी मग जिती
स्वकर्माची कां रत्तिभरहि, न वाटे तुज क्षिती?
मुखस्तंभा !! दे जाब, मजपुढती राहुन उभा
दिली कोणी, हे ताण्डव घडविण्याची तुज मुभा? !!!
स्वसूक्तांशी निष्ठा, तिळभर न, ज्याला उमगली !
करी सत्यासत्याचि गफलत, साक्षातच कली !!
तुझा ऐसा धर्म, घडवि नरसंहार जबर
मुकाट्याने, भोग अटळ, करणीचे, पत्कर.!!!
जश्या आक्रंदील्या कुरुकुलपुरंध्री हतधंवा
कुरू योध्यांच्या, भग्न कवळिती माता, सुतशवां!!
तश्याची टाहो फोंडतिल, विधवा यादव स्त्रिया
गळे भ्रात्यांचे घोंटत, यदुकुळें जातिल लया.!!!
’पिता-माता हीन,’ भटकशिल रानीं, वणवण !
क्षुधेलाही भासेल, द्वय कवळांची चणचण !!
विषादाग्नीनें होंरपळुन, अखेरीं थंकशिल !!!
शराने व्याधाच्या तडफडत, प्राणां मुकशिल" !!!!
ललाटीचा तो लेख परिसुन, चित्तीं चंरकला !
त्रिलोकाचा स्वामी, थंरथंरत पाठीं सरकला !!
करी ’माता शक्ती’ स, करद्वय जोंडून नमन !!!
स्विकारी तें कर्मफल अटळ, शेंला पसरुन !!!!
*********************************
------ रविशंकर.
१६ डिसेंबर २०११.
No comments:
Post a Comment