मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Saturday, December 13, 2008

॥ आभाळ वांकले खाली ॥



सत्ताविस वर्षापूर्वी, 
शेंल्यांस मारली गांठ
साक्षात् , घरीं लक्ष्मीची
 पाउलें उमटलीं सात ॥१॥

गवळणीपरी, जपलेस

हे नितांतसुंदर घरटें
खेंरीज 'शतायु' तुजला
मागणेच कुठले उरते ? ॥२॥

शिवलास मला अंगरखा

 ज्यांस ना खिसा, ना बटणें
घालतांच तो, अंतरलें,
कष्ट-दु:ख बापुडवाणें ॥३॥

पाहतां मान वळवून

मी आज विसांवत, मागे
दिपवितीं, तूंच विणलेले
झगमगते रेशिमधागे ॥४॥

झोंळीत तोंकड्या माझ्या

 तूं अशी गंवसणी घाली
मी पंख पसरतां, सारे
आभाळ वांकले खाली !! ॥५॥

****************
---- रविशंकर
डिसेंबर २००१

No comments:

Post a Comment