मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Thursday, December 11, 2008

॥ बिल्डर ॥

(व्यंगोक्ति)



पोरगं म्हटलं," ’म्याट्रिक्’ ला, नापासांत नांव आहे
एकोणतीस टक्क्यांवर,कुठं शिरकाव आहे?"
मी पुसलं डाफरत,"बोला, काय प्रस्ताव आहे?"
सोन्या म्हणे,"ठेकेदारीत शिरणं, हाच उपाव आहे ! ॥१॥


धेडगुजरी बिगार्‍यांचा, हाताशी जमाव आहे

'किति शिमिट्‌-खडी-वाळू?', वडार्‍या ला ठांव्‌ आहे !
बुकं शिकून आलेल्यांची, निव्वळ धांवाधांव आहे
'कल्लाप्पा' च्या मिशीवरच, स्थापत्याचा तांव्‌ आहे !! ॥२॥

लफड्यांतल्या भूखंडाचा, मातीमोल भाव आहे

आरक्षण उठवायचा, पालिकेत ठंराव आहे !
मायबाप सरकारात, सगळी 'कांव्‌ कांव्‌' आहे
विकला जात नाही असा, कोण ’सोंवळा राव’ आहे ? ॥३॥


सांडपाणीनाल्यालगत, आरेखित गांव आहे

गृहनिर्माणप्रकल्पाचं, 'नंदनवन' नांव आहे !!
नळजोड नाही म्हणून, नाल्याकांठी बांव आहे
जा-ये करण्यासाठी, 'राडारोडा भराव' आहे !! ॥४॥

डांस-दुर्गंधी चा, सारा प्रतिस्पर्धी बनाव आहे

खड्डे खोंदून 'बुकिंग्‌' करूं , पैश्यांचा वर्षाव आहे !
बापूंच्या डोंळ्यांदेंखत, दाखल्यांचा लीलांव आहे
’कमेन्समेंट्’ ,’कंप्लीशन्’, सगळी लावालाव् आहे !! ॥५॥

चौरस फुटांस पंधराशे, गेला बाजारभाव आहे

'चारापाण्याचा' देखील, त्यांतच अंतर्भाव आहे !
चपराश्याच्या भुकेंसाठी, ताजा ’वडा-पाव’ आहे !
साहेबाच्या नैवेद्याला, 'चिकन्‌ च्यांव्‌ च्यांव्‌' आहे !! ॥६॥

झांकली मूठ दाबायचा, मला थोडा सराव आहे

चोराच्या आळंदीचा, वारकरीही सांव आहे !!
नगरसेवकांचा ’पालिके’स घेंराव् आहे
’चर-खा’ पुढं कुठं, ’नेकी’ चा टिकाव आहे ? ॥७॥

'ऐंशी काळे-वीस गोरे', हुज्जतीला मज्जाव आहे

'एक' आणि 'दोन' मध्ये, 'चलनी भेदभाव' आहे !!
'काळे' जमा झाले की, मीच 'बाजीराव' आहे!
'गोंरे' मुकाट भरले तरच, घेणार्‍याचा निभाव आहे !! ॥८॥

प्लॅन् पास झाला की, सगळं ’घूमजाव्’ आहे

’पार्किंग् नी एफ्-एस्-आय्’ वर, आपलाच तर तांव् आहे !
आर्किटेक्ट्-डिझायनर मध्ये बेंबनाव आहे
गवंड्यांनीच बांधायची प्रथा, गांवोगांव आहे !! ॥९॥

’जमेल तेव्हढं - होईल तसं’, बांधून द्यायचा डाव आहे

एकतर्फी कराराचा, भरभक्कम बचाव आहे !!
’बिल्डर-प्रमोटर’ या ’उपाधी’ चा प्रभाव आहे
पडलं, तर ’प्रसिद्धी’, अन् टिकलं, तर ’नांव’ आहे !! ॥१०॥

'सहकारी गृहसंस्था', हास्यास्पद नांव आहे

'एकमेकां आडवे पाडूं', लोकांचा स्वभाव आहे !!
मिळेल तें लाटायची, मला देंखील हांव आहे
मुख्यमंत्र्यांपर्यंत थेट, आपलीसुद्धां धांव आहे !! " ॥११॥

म्हटलं,"शाब्बास पोरा, तुला दगडाचा घडाव आहे !

अकलेच्या कांद्यालाच, आजकाल उठाव आहे !!
टगेपणांत गांवभर, कमावलेलं नांव आहे !!!
देवाशप्पथ, लेका तुला 'बिल्डर' व्हायला वाव आहे!!!! ॥१२॥

*********************
----- रविशंकर
नोव्हेंबर २००२

No comments:

Post a Comment