मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Monday, December 8, 2008

सुवर्णपान ॥


(व्यंगोक्ति)
’राणा प्रताप-तात्या टोपे
टिपू-शिवबा’, इथंच घडले
याच भारतभूमीवरती
अत्याचारांविरुद्ध लढले ॥१॥

व्यासपीठांवरून, नव्हते
’दादा-भाऊ’ बडबडले !!
घरभेद्यांनां पायीं तुडवत
दहशतवादास, लोंक भिडले ॥२॥

हिन्दू-मुस्लिम-शीख-ख्रिस्ती
जात-पंथ-धर्म, झडले
खाल्ल्या ताटांत थुंकणार्‍यांचे
हात कलम होंऊन पडले! ॥३॥

स्वातंत्र्याच्या, जयघोंषांत
व्यसन ’खादी’ चेच जडले
’बापूं’नां ही, टोंपी घालून
लफंगेच माथीं चढले !! ॥४॥

भिक्षेकरी जनतेच्या
शिरीं, चारशे चोंर, मढले
हवे होते ’लोकशिक्षण’
झोळीत ’आरक्षण’ पडले!! ॥५॥

साड्या-चोळ्या-ताटांपायीं
विकलेलेच मत नडले
यथा प्रजा, तथा राजा’
हेंच सत्य उलगडले ॥६॥

षंढांच्या या साम्राज्यांत
स्वत्त्व धारातीर्थीं पडले
कुंकवाला, हे धनी नकोंत
इंग्रज देखील परवडले!! ॥७॥

इतिहासाचे सुवर्णपान
आज उलटे उघडले
’अफ़झल’ च्या मृत्युदंडास
’शिवबा’ सुद्धा आडवे पडले !!! ॥८॥

*************
----- रविशंकर
डिसेंबर २००८

No comments:

Post a Comment