मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Tuesday, December 31, 2002

॥ काय नवल ॥



बेलगाम स्वातंत्र्याची, पन्नास वर्षं साजरी झाली
काय नवल, लोंकशाही ताटाखालची मांजरी झाली ? ॥१॥

साड्या-चोळ्या-ताटं-वाट्या, मतपेंटीत भांडत आहेत
काय नवल, सत्तरटक्के झोंपडपट्ट्यांत नांदत आहेत ? ॥२॥

दुधापेक्षा स्वस्त दारू, जिथं दुथडी वहात आहे
काय नवल, पदवीधरही बेकारीतच रहात आहे ? ॥३॥

केबल टी. व्ही. नाकारायची, ना कुणात हिम्मत आहे
काय नवल, 'एड्‌स्‌' हीच पंचविशीची किंमत आहे ? ॥४॥

भ्रष्ट शिक्षणव्यवस्थेचं मूळ, बरंच खोल आहे
काय नवल, प्रज्ञेलाही परदेशांतच मोल आहे ? ॥५॥

जहागिरदारी जिथं, नसांनसांत भिनली आहे
काय नवल, उद्योजकता लॉटरीतच शिणली आहे ? ॥६॥

संस्कृतीची कुलवधू, जिथं तलाक्‌ मागते आहे
काय नवल, 'भगवद्‌गीता' वनवासांतच जगते आहे ? ॥७॥

पल्लेदार स्वाक्षरीला, जिथं अंगठाच वाली आहे
काय नवल, विवेकबुद्धी बाजारबसवी झाली आहे ? ॥८॥

काय सांगूं नवल एकेक, नवलपूर्ण गाथा आहेत !
झिंगलेल्यांच्या नशिबांत, फिरंग्यांच्या लाथा आहेत !! ॥९॥

********************
----- रविशंकर.
३१ डिसेंबर २००२

No comments:

Post a Comment