मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Friday, November 10, 2023

|| इंदिराजी ||

 

|| इंदिराजी ||

 



 

समर्थ, संसार चांलवाया

इंदिराजीं ' चे च घराणे

राज्य सोंपवुन त्यांचे हांतीं

मस्त रहावें, गात तराणे !!     || ||


नातीं-गोतीं-आपले-परके

कमी-ज्यास्तही येणे-जाणे

काय-कुणाचे-किती करावे ?

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!     || ||


लग्न-मुंज-वास्तुशांत आणिक

नात्यांतिल डोहाळजेवणें

कुठे-किती आहेर करावे ?

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!     || ||


खर्च वेंच नी हिशेबांतले

खर्च-जमे तिल रुपये-आणे

तंतोतंत कसे जुळवावे ?

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!     || ||


पोरां-टारांचे हंटवाद

थोरांचेही थेर अडाणे

कशी कुठें वेंसण घालावी ?

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!     || ||


नोकर-चाकर-कामक-यांचे

प्रासंगिक ' अंगांतिल येणे '

कसा-कुठे रट्टा हाणावा ?

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!     || ||



 

 

अवघड वाटायास लागतां

ओझे घोड्याचेहि, ओंढणे

' ओंढावे हत्ती चे ओझे '

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!     || ||


म्हणून , घंरच्या सत्तास्थानीं

बसवावें ' इंदिरा ' घराणें

वरवंटा कैसा फिरवावा ?

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!     || ||


वरवंट्याखालीं, फुलवावे

छन्द, न उगाळतां गा-हाणे

भोंवतालच्या टग्या जगाला

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!     || ||


ज्याच्या, त्याच्या गळां तंगड्या

कळूं न देतां त्यांस, घालणें

कुठे असे कौशल्य शिकावे ?

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!     || १० ||


पथ्य एक, अंमलास त्यांच्या

आव्हान न, द्यावयास जाणें

श्राध्द कसें घालतात त्याचे ?

केवळ ' इंदिराजी ' जाणे !!!    ||११ ||



-- रविशंकर.

१० नोव्हेंबर २०२३.

No comments:

Post a Comment