मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Wednesday, March 30, 2016

॥ शाप ॥





लहानपणीं सगळं कांही
गळा काढतांच मिळत असतं
दुसर्‍याक्षणीं डोंळ्यांतलं
पाणीसुद्धां खळत असतं

पोरवय सरलं, की
' मी पण ' छळत असतं
रास्त गळा काढला, तरी
कुणीसुद्धां हिंगलत नसतं !!

किंचित समज आली की
' माझं- तुझं ' कळत असतं  
' तुझं ', ' माझं ' झालं, तरी
' माझं ' तुला मिळत नसतं !! 

तरूणपण प्राप्त होतांच
सारं जग बदलत असतं
' तो - ती ' समोर, पिकलेलं
शहाणपणही चालत नसतं !!

मोठेपणीं, ' आपलं - तुपलं '
' बरं-वाईट ' कळत असतं,
' जगणं ' मात्र गाड्या-घोडे -
 - बंगल्या ' पाठीं पळत असतं !!

खटकलं, तर ' बघून घेतो '
म्हणून रक्त खंवळत असतं
दांतीं तृण धंरल्याशिवाय
कांहीसुद्धां निवळत नसतं  !!

' सोनं - नाणं - पैसा - अडका '
जीव घालवून मिळत असतं
मनःस्वास्थ्य, ओंजळीतनं
थेंबे-थेंबे गळत असतं      !!

' माणूस ' नामे गाढव, मात्र
तें च दळण दळत बसतं
कळतं सगळं, पण कांहीच
कळूनसुद्धां वळत नसतं   !!

पोक्तपणीं, रुचि संपतां
नको तितकं मिळत असतं
आपल्या पायांखालीं सुद्धां
बरंच कांही जळत असतं  !!

' स्वीयकरणी ' नामे भूत
खनपटीला अढळ बसतं
देवपूजेला लागलं तरी
प्राक्तन कांही टळत नसतं  !!

आंतल्या गोष्टी, सारं जग
चंवीचंवीनं चंघळत असतं
जेव्हां गांठवलेलं सारं
डोंळ्यादेखत वितळत असतं  !!

उतारवयीं, संध्याछायांत
सारं सारं बदलत असतं
' माझं ' सगळं वाटलं, तरी
परत कांहीच मिळत नसतं !!

' जगणं ' कश्याशी खातात ?
ते म्हातारपणींच कळत असतं
' फुलपाखराचं जगणं ', फक्त
फुलपाखरालाच मिळत असतं...

' फुलपाखराचं जगणं ', फक्त
फुलपाखरालाच मिळत असतं... ... !!!

*****************************************************************************
-- रविशंकर.
३० मार्च २०१६.








No comments:

Post a Comment