॥ ’किश्या’ च्या ’नाना’ ची ’फूंक’ ॥
[एक झंणझंणीत कोल्हापुरी कलगी-तुरा]
,"रामराम पावनं... ...आपुन ’संपतराव साबळे’...
कोल्हापुरी मिस्सळ हानाया आलाय्सा न्हवं हितं?...मंग ही तर्री पयली चाकून बगा जरा...त्वाण्ड भगभगतंया काय त्ये... ...अनि मंग बुडवा पाटीचा पाव रश्श्यामंदी... ...कसं?
आमचा ’किसन सरळ्या’ म्हंजी ’किश्या’, आन् ’नाना ब्येरक्या’ म्हंजी ’नाना’ ही दोगंजनं हाईत न्हवं, आ s s s s गदी साळंपास्नंची मैतर बगा... ...म्हंजी आगदी चड्ड्या-लंगुट्या बी आदली-बदली करनारी म्हना की वो.
आगदी बगा, साळा कालिजात बी तालमीच्या आकाड्यात संगं संगं घुमल्याली... ...
तर म्होरं काय झालं, की हे ’किश्या’ न्हवं काय, सास्त्र घिऊनश्यान् कालिज्यात जायाला लागलं... दांडगी दांडगी बाडं वाचाया लागलं... ...पदवीदर बी झालं बगा...मंग काय त्ये ’अंदस्रद्दा चळवळ’ का काय त्ये म्हनत्यात न्हवं?... त्ये कराया लागलं बगा... ...
आनि कामातनं ग्येलं की वो चांगलं चुंगलं प्वार... ...पार डोस्कं तंरकाटलं बगा त्येचं. !!
आतां मायन्दाळ बुकं वाचूनश्यान् श्यान्या झालेल्या ह्या पोराचं लगीन लावूनश्यान् द्याया नगं?
अवो गावातल्या ’आबां’ची थोरली ल्योक... ... ती ’रंगी’ हाय न्हवं, ती बी हेच्यावानीच चार बुकं शिकल्याली... ...आन् तिच्या मनांमंदी बी ह्यो काडीपैलवान भंरल्याला... ...
आतां सगळंच आसं झ्याक् जमल्यालं... ...पन ह्ये येडं ’किश्या’ च आंगात आल्यावानी घुमाय् लागलं बगा...
घरातल्या मानसास्नी म्हनाया लागलं, " लगीन करूनश्यान् सोंसारात पडलं, तर सुकी व्हतंय्, आसं सास्त्रापरमानं शिद्द करून दावा" म्हनून...!!!
आतां काय करायचं वो... ...ऑं?
तसं म्हनायला ’आबा’ ना बी ह्यो जावाय् पसंत हुता बगा... ...
किश्याच्या घरची मानसं समदं इलाज करूनश्यान् हेलपाटली... ...
डागदर झालं...आंगारं धुपारं झालं...बाबा भगत बी झालं मायंदाळ...पर काय बी उपेग व्हईना, आनि किश्याच्या डोस्क्यावर बसल्यालं सास्त्राचं भूत काय सोडंना बगा बेन्याला... ...
आतां काय करायचं वो?
शेवटाला आबानां च त्ये बगवंना. मंग बगा त्येंनी योक सादू आनला धरूनश्यान् नरसोबाच्या वाडीवरनं...
त्येनं किश्याच्या टाळक्यावरती ह्ये s s s आस्सा हात ठिवून आसला काय इदरकल्यानी मन्तर मारलाय् म्हन्तासां ह्या ’किश्या’ वर, समद्यांची डोंस्कीच येडबाडली...!!
ह्या ’किश्या’चंच सन्याशी सादू व्हऊन बसलं की वो... ...!!!
आन् त्ये आतां द्येवाधरमाची बुकं च वाचत सुटलं...
कपनी घालूनश्यान् आंगाला आन् डोस्क्याला राक बी फासाया लागलं...!!
कुटंतरी येड्यागत बगत बसाया लागलं...
’मला ’मोक्स’पायजेल हाय...सोर्गात जायाचं हाय’ आसलं बी काय काय बरळाय् लागलं... ...
सोन्यासारक्या ’रंगी’ कडं ढुंकून बी बगं ना बगा त्ये...
आतां आक्रीत व्हऊनश्यान् आसं बसलं... ...ही ’रंगी’ लागली झुरनीला... ...न् काय इच्यारतांयसा... ...
आनि ’रंगी-आबां’ सकट ह्या ’किश्या’च्या ’आय्-बा’ नी बी डोस्क्यावर हात मारून घ्येतला बगा.!!!!
काय करायचं सांगा त्येनी समद्यानी ?
मंग काय झालं की... ..., ह्या ’रंगी’ ची योक जुवळातली भन हाय बगा... ...ती ’गंगी’ हाय न्हवं?...ती च.
ह्या गंगी चं डोस्कंच लय भारीतलं...
तिनं आबास्नी सांगटलं की ,"आतां ह्या ’किश्या’ चं त्ये मैतर हाय न्हवं साळंतलं......त्ये ’नाना ब्येरके’ वो...त्येलाच बंलवूनश्यान् घ्या... ...त्ये च कायतरी करंल बगा ह्या ’किश्या’ साटी."
मंग दुनीकडल्या मानसानी इच्यारइनिमय करूनश्यान् ह्या ’नाना बेरक्या’ ला आनला धंरूनश्यान् येकदाचा.
बारा पिंपळावरचं त्ये... ...आसं घावतंय् व्हंय् झंटक्यात ?
ह्ये ’नाना’ ’ रंगी ’ च्या घरला आल्यावर का न्हाय ’आबा’ म्हनलं त्येला," नाना आतां तूंच काय त्यो जमालगोटा द्ये बाबा ह्याला... ...न्हाय्तर ह्ये ’किश्या’ जातंय् बग आतां चिपळ्या वाजवत कुटंतरी... ...ह्या ’रंगी-किश्या’ पायी आतडं तुटतंय् रं बाबा आमचं...काय मागशील त्ये द्येतो बग ’नाना’ तुला..."
’नाना’ बी कसलं ब्येनं म्हनून सांगूं तुमास्नी...म्हनलं," काय बी घोर लावूनश्यान् घिऊ नका आबा तुमी कुनीबी... ... ह्या ’किश्या’ च्या डोस्क्यावर बसल्यालं भूत येका झंटक्यात न्हाय् उतरिवलं न्हवं, तर ’बेरक्या’ चं नांव न्हाय् लावनार हयातीत !!...काय?... ...पर म्या मागंल त्ये द्येनार न्हवं वाजवूनश्यान्?... ...मागनं कसली बी खळखळ नाय आयकून घ्येनार आपुन... हां...समद्याम्होरं पयले झूट सांगून ठिवतोय्."
आतां बगा, आबांसकट समद्यांनीच ह्या ’नाना’ ला कोपरापास्नं रामराम घातला,"तूं च कर बाबा ’नाना’ आतां काय त्ये येकडाव... ...मागशील त्ये दिलं तुला म्हून समज... ...झालं न्हवं आतां तुज्या मनासारकं?"
नाना नं मंग डोंस्क्यावरली गांदीटूपी जरा तिरकी करूनश्यान् त्या ’ लकोबा लोकण्ड्या ’ गत आ s s s श्शी फुडं सरकिवली...आनि डोस्कं जरा मागनं खाजिवलं बगा... ...
आनि 'किश्या' जवळ जाऊनश्यान् त्येच्या कानामंदी आसली भारीतली योकच फूंक मारकी का न्हाय त्येच्या मायला... ...येका झंटक्यात त्ये येडं आवदांड शानं झालं की राव...!!
आनि 'रंगी' कडं बगूनश्यान् लाजाय् बी लागलं...भंवल्यावरल्या न्हवरीगत...हीः हीः हीः हीः ...!!!
मंग आबा नी 'नाना' ला इच्यारलं," नाना...लई उपकार झालं रं बाबा तुजं... ...पोरगं माघारी आनलंस बग आगदी सप्पाचट ... तंवा काय दिऊं रं बाबा तुला आतां?"
आनि कुनाच्या डोस्क्यात काय बी परकास पडायच्या आदुगरच, ह्या ’नाना’ नं पैल्या झंटक्यात ’गंगी’ कडं च ब्वाट दावलं न् काय.... ...!!!!
आनि आबा सकट समद्यांनी डोस्क्यावर हात मारूनश्यान् घ्येतला...!!!!
आतां ती च ’किश्या’ च्या कानामंदी ’नाना बेरक्या’ नं मारल्याली ही ’जमालगोटा फूंक’ तुमीच बगा... ...
रामराम."
*************************************************************
किश्या [ नाना कडं ब्वाट दावूनश्यान् ]:
"बगा बगा हो येक
हिरवट म्हातारं
त्येला पायजेती
गाल गोबरं गोबरं
जनु शाळ्यातलं
कवळं कवळं खोबरं
पन ह्या वयात कोन
घेनार हाय गालगुच्चा
आन् म्हननार हाय,
"आरं लुच्चा!"
नाना:
"म्हातार्याच्या ’खोबर्या’ ला
जंवा चिकटंल ’ऍशा’
दांतओंठ खात, तंवा
जळशील न्हवं ’किश्या’?"
किश्या:
"आपुन आता जळनार
येकदाच खाक
शेवटाला मसनात व्हनार
चिमटीभर राख
गेल्या मसनात आता
आपल्या गंवर्या
अजून कश्याला रं
पायजेल हाय ’ऐश्वर्या’ ?"
नाना:
"सोर्ग कुनी बगटलाय्
जाऊनश्यान्, किश्या?
’रंबा-म्येनका’ द्येवांम्होरं
काडी उटाबश्या !!!
व्हऊं मोकळं, सरनावर
घालून, मिश्या-दाढ्या
’ऍश’ बिगर वर जाऊन
करतूंस काय गड्या?"
किश्या ’आद्यात्मा’ च्या घोड्याला टांच हान्तंय्...
आनि नाना लगाम धरूनश्यान् म्हन्तंय्... ...
"किश्या,किश्या थांब बाबा,
आयक माजं थोडं
बशीव खाल्ती, उदाळल्यालं
’आद्यात्मा’ चं घोडं
घोडं दावील ब्येनं,
तुला सोर्गाची वाट
आपली हतंच बरी हाय
बाजल्याची खाट !!
’रंबा-म्येनका’ द्येवासाटीच
आसत्यात, माज्या बाळ्या !!
आपुन निस्त्या वाजिवनार
शिट्ट्या आन् टाळ्या !!!
सोर्गात कुटली मज्जा रं
हितल्यावानी, जंगी
हाय कां तितं, तुजी-माजी
’रंगी’ आन् ’गंगी’ ?
इसर बाबा, डोस्क्यातला
सोर्ग आन् मोक्ष
वाटंवरच तुजा-माजा
व्हईल कपाळमोक्ष !!
दम, जाईपत्तुर ह्यो
’आद्यात्मा’ चा ’रॅश्’
हतंच समदं झ्याक् हाय्
कॅश् आनि ऍश्" !!!
किश्या:
,"आवं विंजनेरसायब, नगं नरक का सोरग
आपन सादी मानसं, बरं आपलं हतलं जग
परतेक गोष्टीसाटी हाय एक काळयेळ
बाळपनात फकस्त शिक्षान आन खेळ
ज्वानीत मदिरामंडळ आन रस्सामंडळ
पन मग येतीया आयुक्षाची संध्याकाळ
हतनं जायाच्या आगुदर व्हा विच्छाबगर
तवाच तुमचा जीव निगंल तगमगीबगर
आवं आद्यात्म म्हंजी मारग जगन्याचा
डोसक्याला तरासाबगर कर्म करन्याचा"
नाना:
," किश्या किश्या बाबा, तुला
लागलंय् कां याड?
’आद्यात्मा’ चं खूळ त्येवडं
टाळक्यातनं काड
आस्सं च व्हतंय् बग किश्या
’साटी बुद्दी नाटी’
हातचं टाकून नगं धांवूं
बाबा, पळत्यापाटी
’आद्यात्मा’ च्या वाटंवर
येडबाडलास तर, बाबा
येत्याल पट्ट्या बान्दाया
’म्येनका’ आनि ’रंबा’ ?
’सोर्गा’ त लागलं जर
तुजं आंग तापायला,
’रंबा-म्येनका’ येत्याल
तुजं डोस्कं चेपायला?
हेच्यापरीस काय, तुला
डोस्कं फोडून सांगूं?
आपला ’सोर्ग’ ह्यो च
जितं ’रंगू’ आनि ’गंगू’ " !!!!
’नाना बेरक्या’ ची ’किश्या सरळ्या’ ला ’लाष्ट वार्निंग्’... ...
,"आरं ए ’किश्या’...
शिरलं न्हवं आतां डोंस्क्यात तुज्या ?... ...
साटीम्होरं व्हंत्यात बग
गाल गोबरं गोबरं
लई ग्वाड आस्तंय् बाळ्या
शाळ्यातलं ’खोबरं’ !!
घ्ये हुडी आकाड्यात
शड्डू ठोंकून ’किश्या’
’रंगी-गंगी’ संगच
आतां काडूं उटाबश्या." !!!!
किश्या - नाना:
"’आद्यात्मा’च्या मटकी ला
’किश्या’ काडी म्वाड
’नाना’ घाली ’ऐहिक’
फरसान ग्वाड
’वात्रटिकं’ चं वर
’खोबरं’ खंवट
बोली चा गांवरान
वतलाय् कट !!
झंनझंनीत मिसळी ची
कोल्हापुरी रानी
खानारी मागत्यात
तांब्याभर पानी !!
वंरपून, लोंळत्यात
’कोल्लापुरी ब्येनी’ !!!
फिदिफिदी हांसत्यात
’किशी’ आन् ’नानी’ " !!!!
********************
----- रविशंकर.
२८ एप्रिल २०१५.
॥ इति श्री ’खडाखडी’ खण्डे ’वडावडी’ पुराणे नवमोन्त्याध्याय: समाप्तः ॥
श्रीवात्रटरसिकार्पणमस्तु !!!
*************************************************************
No comments:
Post a Comment