जगणं म्हणजे...
समृद्ध होणं
सश्रद्ध होणं
सशब्द होणं
अर्थबद्ध होणं
कधितरी
निःशब्द होणं
विशुद्ध होणं...
वयोवृद्ध होणं नव्हे. !!
जगणं म्हणजे...
सूज्ञपणा शिकणं
यथावकाश पिकणं
सोन्यासारखं चिकणं
कुशंकां टांकणं
नजरचुका झांकणं
आशाप्रभा फांकणं
न पिचणारी कांकणं
झंझावातात टिकणं...
स्वत्त्व विकणं नव्हे. !!
जगणं म्हणजे...
रणांगणीं लढणं
क्षणाक्षणाला घडणं
बर्याचवेळां पडणं
अखण्ड धंडपडणं
परिस्थितीशी झगडणं
शान्ति तह बिघडणं
निराशेत चंडफंडणं
परत उठून भिडणं
उन्मत्तांना रगडणं
गुलाब वेंचत खुडणं
पंचविशीत जीव जडणं
कधिकधी मोकळं रडणं...
मनांत कुढणं नव्हे. !!
जगणं म्हणजे...
मोर होणं.
रेंखीव चन्द्रकोर होणं
परचित्तचोर होणं
प्रीती त बिनघोर होणं
नोकरीत ढोर होणं
पाठच्यां चा थोर होणं
लढाया घनघोर होणं
बुडत्याचा दोर होणं
करवन्दीचं बोर होणं
आनन्दविभोर होणं
निरागस पोर होणं...
शिरजोर होणं नव्हे. !!
जगणं म्हणजे...
जिवलगाचा सहवास
मोगरकळ्यांचा सुवास
कधीकधी अज्ञातवास
पदराआडचा एकांतवास
एकाच्या उरांत
दुसर्याचा श्वास
ऐहिक सुखांचा निवास
आत्मशुद्धीसाठी उपवास
अज्ञाताकडं प्रवास
सीता-रामा चा वनवास...
कारावास नव्हे. !!
जगणं म्हणजे...
कोsहम्? चा अर्थ कळणं
डोंळ्यातलं पाणी खंळणं
कळतंय् पण न वळणं
विवंचनांनी छळणं
उपदेशांची दळणं
पढतमूर्खांतनं निखळणं
निश्चय न ढंळणं
धूतवस्त्रही मळणं
सुंठीवांचून खोंकला टंळणं
कल्पनांची भजी तळणं
चौफेर उधळणं
कृतकर्म च फळणं
जखमा भळभळणं
स्व्प्नांमागं पळणं
मधुबाला बघून चंळणं
अर्धांगीत च विरघळणं
विषादांत जळणं नव्हे. !!
जगणं म्हणजे...
ज्ञानवन्त होणं
विचारवन्त होणं
आयुष्याचा वसन्त होणं
घरच्यांचा सुमन्त होणं
जिज्ञासूं चा महन्त होणं
पीडितांची खन्त होणं
कीर्ति दिगन्त होणं
जमलं तर सन्त होणं
राखेतनंही जिवन्त होणं
अनन्त होणं
नवश्रीमन्त होणं नव्हे. !!
जगणं म्हणजे...
आतून वाटणं
उराचं दाटणं
संयमाचं लाटणं
चोंळीची बटणं
लाजूनच तुटणं
डोंळ्यांचं पारणं फिटणं
अनुरागीं फुरंगटणं
विरही नेहांचं
उरांउरीं भेंटणं
शब्दातीत पटणं
मतभेद मिटणं
चकाट्याही पिटणं
सुहृदांसाठी झटणं
ध्येयासाठी झपाटणं
हव्यासाशी फाटणं
हांवरटपणा छाटणं
मोफत चाटणं नव्हे. !!
जगणं म्हणजे...
दुधानं तोंड भाजणं
प्रेमविवाह गाजणं
अर्धांगा ला भजणं
रसिकतेचं सजणं
मनांत माण्डे शिजणंएकातांतलं लाजणं
समर्पणीं माजणं
कणाकणानं झिजणं
सुखांत चिंब भिजणं
आगडोंब विझणं
तृप्ति त थिजणं
सोबत निजणं नव्हे. !!
जगणं म्हणजे...
योजलेलं ओंफट् होणं
बर्याचवेळां नट होणं
नको तेव्हां झेंगट होणं
टाळलेलंच अंगलट येणं
विद्वत्सभांत बावळट होणं
प्रयत्नांत चिवट होणं
चिन्तनांत विपट होणं
व्यवहारांत खट होणं
मैत्रिणीशी नटखट होणं
अर्धांगीशी लगट होणं
जीव जंडवून वेडपट होणं
उर्मट होणं नव्हे. !!
जगणं म्हणजे...
रसिक कलाकार होणं
वीणेचा झंकार होणं
शब्दाचा आकार होणं
षड्जातला गंधार होणं
लंगोटियार होणं
वेलीचा आधार होणं
भिरभिरणारी घार होणं
सार्थक भारंभार होणं
श्रीरामाची खार होणं
तलवारीची धार होणं
लठतां लढतां ठार होणं
आभाळाच्या पार होणं
निराकार होणं
ओंकार होणं...
भुईभार होणं नव्हे. !!
*******************
--रविशंकर.
१९ मे २०१४.
No comments:
Post a Comment