मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Thursday, January 15, 2009

॥ अमृतवेल ॥

॥ अमृतवेल ॥


वृत्त: ओंवी

पहांटेस, येतां जाग
अंबा पावली, पावली
दारीं माझ्या, तारुण्याची
मैत्रवेल फोंफावली !

पानोंपानीं टंवटंवी
रंग हिरवा, हिरवा
आंठवांचा, वेलीवर
घुमे मंजुळ पारवा !

फुलले न, अंगोपांगीं
चांफे-गुलाब, गुलाब
तरी घाली भूल मनां
गार सांवलीचा लाभ !

गप्पाटप्पा विनोदांचा
यावा सुकाळ, सुकाळ
नाहो चिंब, सुगंधात
आयुष्याची संध्याकाळ !

दिन, उरले सुरले
असे जगावे, जगावे
वेलीला या, अमृताच्या
फूल कस्तुरीचे यावे !!

********
----- रविशंकर.
१४ फेब्रुवारी २००९.

॥ कृतद्न्यता ॥

॥ कृतद्न्यता ॥



वृत्त: ओंवी

होतो तरुणपणीं । गोळे सांद्र मातीचे
गुरू तुम्ही जातीचे । भेंटलांत !

घडविलेत पक्के । मृत्तिकेचे घडे
भरलेत चोंखडे । ज्ञानामृत

कठोर शिस्तीची । छडी लागे छमछम
विद्या आली घमघम । विनात्रास !

विवेकाचे, ध्यानीं । पेंरलेत बीज
केली ध्येयें काबीज । घरींदारीं

पोंटतिडिकेने । गाळलांत घाम
असा, व्हावा राम । रावणाचा !!

धन्य झालों, तुमच्या । शिकून गुरुकुलीं
कांठोकांठ भरली । कोरी पाटी !

द्यावे, देवें तुम्हां । अजरामरपण
भांसते क्षण क्षण । तीव्रतेने !

अतां, नातवण्डां । पाजाया बाळकडूं
घ्याल काय खडू । पुन्हां हांतीं ?

कसे फेंडूं, एका । जन्मांत हें ऋण ?
घ्यावी गोड करुन । कृतद्न्यता !!!

**********
----- रविशंकर.

१५ जानेवरी २००९

Saturday, January 10, 2009

॥ स्नेहसम्मेलन ॥

॥ स्नेहसम्मेलन ॥


हांकेला ओ देंत, झणीं
आलां धांवत, धांवत
काळजांत आनंदोर्मी
नाही मावत, मावत ! ॥१॥

आंठवांच्या सुगंधाचा
सडा शिंपला, शिंपला
ठेंवी झांकून मोती हा
तृप्त मनाचा शिंपला !! ॥२॥

उपजीविकाव्यापांच्या
विश्वव्यापी अंधारांत
ठेंवा तेंवत स्नेहाचा
नन्दादीप अंतरांत !!! ॥३॥

********
----- रविशंकर.

१० जानेवारी २००९.