मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Wednesday, December 17, 2008

॥ संधी ॥


आयती चालून आलेली, सोंन्यासारखी संधी होती
हात मारला असता तर, सात पिढ्यांची चांदी होती !
अंतरींच्या आवाजाला, नको तेव्हां पालवी फुटली
तोंडून टाकूं म्हटलं तर, बुडाखालीच फांदी होती !! ॥१॥

'माय मरो मावशी जगो' म्हणणार्‍यांची सद्दी होती
त्यांच्या लेखी, 'द्न्यानेश्वरी न्‌ भगवद्गीता' रद्दी होती
कधीच सांपडणार नाही, पक्के माहित होते तरी
उलट्या सुलट्या विचारांची, डोंक्यांत गुद्दागुद्दी होती !! ॥२॥

गळेकांपू संस्कृतीत, उत्कर्षाची खात्री होती
उंबर्‍याबाहेर तांटकळत उभी, जगद्धात्री होती !
शहाला, काटशह द्यायचाच अवकाश होता
एक टोंचणी अनामिक, सलत गात्रोगात्री होती !! ॥३॥

लोभसपणे खुणावणारी, मादक समृद्धी होती
माझ्यासारख्याकडं कुठं, समर्थांची शुद्धी होती?
कुणीतरी कुर्‍हाड घालून, देहाची खांडोळीं केली
कोंसळतांना कळलं, ती सदसद्‌विवेकबुद्धी होती !!! ॥४॥

*****************
----- रविशंकर
नोव्हेंबर २००७.

1 comment:

  1. खूप सुंदर कविता
    http://mumbaipoems.blogspot.com/

    ReplyDelete