मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Tuesday, January 23, 2001

॥ वरात ॥



(व्यंगोक्ति)

गाफिल क्षणीं त्या एकां, केंलास सखें आघात
जाहलाच भिडतां नेहा, जन्मोजन्मींचा घात !
खातमा करीत दिलाचा, घालीत घांव हळुवार
खेळांत नजरबंदीच्या, ठकविलेंस हातोंहात !! ॥१॥

होंऊन तांठ गळपट्टी, पाऊलें हवेंत उडालीं
अननुभूत वीरश्रीचा, चेंव संचरें अंगात !
केंलास मला तूं बकरा, बोहल्यावरीं चढवून
पटविण्यांस रोज पुन्हां तें, कां करिसी यातायात ? ॥२॥

वडिलांस भेंटण्यां आलें, तीर्थरूप तुमचें, लीन
सोंहळा घडे बघण्याचा, तडकाफडकीं पौषांत !
आणलेस वाट्या भरुनी, आईच्या हातचे पोहे
लागले गोड, नी गेली अक्कलही, केंळी खात !! ॥३॥

होकार ठांसुनी भरला, पाहतां न मागेपुढतीं
पाठची बहीण बघून, मी उडालोंच लग्नांत !
जाहली जीसवें होती, दृष्टिभेंट पहिलीवहिली
करवली म्हणोनी तीच, पाठिशी उभी टेंचांत !! ॥४॥

झांकून तिला काढावी तुज, ऐसें साम्य परंतु
धांरदार नाक तिचें, ना तुमच्या कवठी चाफ्यांत !
आमंत्रित सारे जमले गणगोत, खूष समदु:खी
पाहण्यां चामडी पट्टा पडलेला, व्याघ्रगळ्यांत !! ॥५॥

मंगलाष्टकांतीं, दूर सरकतांच अंतरपाट
कंठीं पडतां वरमाला, लागली गळ्याला तांत !
अक्षता शिरीं कोंसळतां, जाहला वाद्यकल्लोळ
'वाजवा' कां म्हणे भटजी, कळलें एका झटक्यांत !! ॥६॥

'सौभाग्यकांक्षिणि' ची तूं , 'सौभाग्यवती' होतांच
आठविती तुझ्या आप्तांचें, हंसणारे कुत्सित दांत !
निर्बुद्धपणें, लग्नांत मिरवलो, घांलुनी हार
स्वीकारीत भेंट शुभेंच्छा, मी उभा शुंभ झोंकांत !! ॥७॥

मापटें उंबर्‍यावरचें, तूं प्रवेशतां, लोंटून
घोंघवें कुरुक्षेत्राचे वारे, सार्‍या घरट्यांत
फॊंडलास आप्पटबार, तूं करीत गौप्यस्फोंट
" मज मुळीच ये न कराया, पोळी-भाजी वा भात" !! ॥८॥

भासलीस तूं मधुबाला, मी मुळी न पर्वा केंली
जाहलीं चहा-पावाने, मधुचंद्राची सुरुवात !
लागतां ठेंच श्वरुरांस, आम्ही न शहाणे झालो
भोंगतो फळें त्याचीच वैवाहिक आयुष्यांत !! ॥९॥

मेटाकुटीस मी आलो, मागण्या- हट्ट पुरवून
नाटकें-सिनेमा-साड्या-दागिन्यांत खर्च अफाट
मी पगार घेंतो, पुढच्या मासाचा, या महिन्याला
कंठतो दिवस शेंवटचा, मी चणे-फुटाणे खांत !! ॥१०॥

खनपटीस बसले, गवळी, धोबी, नी पेपरवाले
चर्मकार, वाणी यांच्या, थकबाक्यांचें झेंगाट !
कानीं पडतां हाकाटी, " ऐकलें काय म्हणते मी ? "
लागतो सांगण्याआधी कामाला, मीच मुकाट !! ॥११॥

वाटण्यांसही अनुकांपा, पुरुषजात लायक नाही
धडधडीत दिसतां खोंल, मारितीं उडी खड्ड्यांत !
वेंढितेंस वटवृक्षाला पौर्णिमेस, जो तोंर्‍यानें
गुंतडा, न माझ्याच्यानें, उलगडेल या जन्मांत !! ॥१२॥

टांकलेस तूं पदरांत, एक पुत्र, कन्या तीन
वागण्यांत पोरांनीही, उचलला तुझाची थाट !
हा दोष नसे पोरांचा, नी कदाचीत तुमचाही
पोहर्‍यांत कोंठून येई, जें नसे मुळीं आडांत ? ॥१३॥

पंचवीस वर्षें करुनी संसार, सूद्न्य मी झालो
तडजोडि एकतर्फीच, ' माझे आई ', घडतांत !
फोंडून खांपरें, झाला माथ्याचा, दगडी पाटा
वाटशी वरून मिर्‍या तूं , वरवंट्याने, ठंसक्यांत !! ॥१४॥

हिरकणीसही कांपील, गें तुझ्या जिभेंची धार
देईल दांडपट्ट्याला, तोंडाचा पट्टा, मात !
वांसला जरी मी जबडा, आवाज येंतसे "म्याऊं"
रंगतो खेळ जादूचा, रोजरोज संसारात !! ॥१५॥

गांजलो, करून करून, ऊठबैस माहेराची
आणलीं स्थळें मेहुणिला थोंरल्या, मोजुनी साठ !
अग्रजा शिष्ठ-गर्विष्ठ, उजविली न अजुनी घोडी
दाविशि न कां तिजलाही, शरसंधानाची वाट ? !!  ॥१६॥

आळशी-निरुद्योगी तो, मेहुणा उनाड लबाड
ऐकवी तोंडच्या बातां, लावीत खिश्याला चाट !
मेहुणी धांकटी उजवी, प्राक्तनीं न जी लिहिलेली
शोंधतां स्थळें तिजसाठी, हळहळें जीव त्राग्यांत !! ॥१७॥

वानरांपरीं नाचविणें या नरांस, कर्मकठीण
दुष्प्र्याप्य कलेंसाठी त्या, बायका लग्न करतात !
साधना घोंर ती, वीस-पंचवीस वर्षें चाले
त्यापुढें नाचतीं नवरे, चुटकीसरशी तालांत !! ॥१८॥

येतां कुणी, विवाहाचें द्यायला आमंत्रण आतां
खदखदून जंगी उकळ्या, फुटतीं माझ्या उदरांत !
लावतो हजेरी सार्‍या, झांडून लग्नकार्यांस
टांकण्यांस अक्षत हल्लीं, शिवशिवतीं माझें हात !! ॥१९॥

वरवधूं एकमेकांस, घालितां लाजुनी हार
उसळतें उरांत हश्याची, गुदगुल्या होंऊनी लांट !
त्यांक्षणीं मला होंणारा आनंद, काय वर्णावा
शब्दबद्ध करितां ये ना, कल्पना थिट्या पडतात !! ॥२०॥

कळवळा येउनी वाटे, मज कींव, दुज्या मट्ठाची
पाहून नवा जातांना अजबळी, त्यांच थाटांत !
वाटे मज सल्ला द्यावा, बेंट्यांस, शहाणपणाचा
काळवेंळ बघुनी शब्द, टांकतो गिळून घश्यांत !! ॥२१॥

पाकीट कोंबुनीं हांतीं दंपतिच्या, आहेराचे
भरपेंट जेंवुनी, बसतो मी टपून, वाट पहात !
पाठवणीच्या वेंळेची, आटपतां रडारड सारी
सामील होंतसे मी ही, निघतां लग्नाचि वरात !!! ॥२२॥

**************
---- रविशंकर.
२३ जानेवारी २००१

No comments:

Post a Comment