मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Sunday, May 31, 2026

|| विदारक ||

|| विदारक ||


 दादा-भाऊ-पोलीस-हैवान

परस्परां चे ' यार ' आहेत

' तेरी भी चुप, मेरी भी चुप

                     मध्ये, सगळे च तयार आहेत        || १ ||

 

पन्नास जीव गेले, तरी

' बडे मासे ' पसार आहेत

निलंबनां ची ऐशी-तैशी

                       अखंड चालूं पगार आहेत           || २ ||

 

  वार्तापत्रं , गुळूमुळू

करीत गप्पगार आहेत

निरुद्योगी ' नेटकरी '

                        ' शेरेबाजी ' त बेजार आहेत       || ३ ||

 

बंदोबस्तात लाल दिव्यांच्या

गाड्या फिरकणार आहेत

तंपासाच्या कामांसाठी

                        पोलीस उसनवार आहेत           || ४ ||

 

चंवकशी समित्यांवरचे

यांतलेच दमदार आहेत

खरे-खोटे, खोटे-खरे

                      अहवाल लिहून तंयार आहेत       || ५ ||

 

हां हां म्हणतां गायब व्हायला

पुराव्यां चे होकार आहेत

तोड करून फिरणारे

                        बक्कळ साक्षीदार आहेत          || ६ ||

 

' तारीख पे तारीख ' वाले

वकील, महा हुषार आहेत

जामिनांवर सोडून द्यायला

                      न्यायाधीशही हंजार आहेत        || ७ ||

 

आज मोर्चे कांढणारे

उद्यां ना दिसणार आहेत

सांत्वना ला जाण्याचेही

                       नक्की ' ईव्हेण्ट ' होणार आहेत  || ८ ||

 

 ' तेराव्या ' ला, गांठीं-भेंटीं स

बडी धेंडं जाणार आहेत

' पक्षाध्यक्ष ' पोंचेतोवर

                         कावळे तांटकळणार आहेत      || ९ ||

 

मृतांसाठी एक लाख 

जखमीं स पन्नास हंजार आहेत

' माय-बापां ' च्या डोंळ्यांतले

अश्रू निराधार आहेत ...

 

' माय-बापां ' च्या डोंळ्यांतले

                        अश्रू निराधार आहेत ... ...    || १० ||

 *******************************************

-- रविशंकर.

३१ मे २०२६ 

 

  

 

 

No comments:

Post a Comment