मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Saturday, August 3, 2024

|| रिम झिम ||

 || रिम झिम ||



बालपणीं नियमीत येतसे

दहा जूनला च, पावसाळा

भंर घालाया त्रासामध्ये

सुरूं होतसे माझी शाळा             || ||


रप रप रप रप धारा पडतीं

अहोरात्र, मी गारठलेला

भंल्या पहांटे दुलई सोडुन

नकोच वाटे उठावयाला              || ||


हांका मारुन मज, कंटाळुन

आई ओंढी पांघरुणाला

म्हणे,“ ओंडक्या, आंवर झंटपट

रे, शाळेला उशीर झाला ”          || ||


तांब्याच्या बंबातिल आधण

मजा और ये आंघोळीला

गरम चहाच्या कपात बुडवुन

फुगलेला बटर च नाष्ट्याला       || ||


नवी-जुनी पुस्तके-वह्या, अन्

टांक-दौतिचा थाट निराळा

घोंट्यापर्यंत लोंबे दप्तर

गणवेशाचा झोंक आगळा            || ||


रेनकोट पांघरून वरूनी

आज्जी चिमटा घेई गालां

सांगे आईसही दटावित

रस्त्याने ने जपून बाळां ‘         || ||


घोंकुन घोंकुन, पाढे-कविता

पांठ करायाचा कंटाळा

गणती चुकतां, छड्या मारुनी

मास्तर करिती हात मोकळा       || ||


बोंट धंरुन आईचें, तुडवित

वाटेंवरच्या, बरबट चिखलां

रोज रोज मी लावी टुमणे

,“ आई, मजला नकोच शाळा “  || ||


वाटेवरच्या डबक्यामध्ये

उड्या मारितां, हो घोटाळा

चहा उडे अंगावर सा-या

दप्तर भिजुनी, लोळागोळा           || ||


आई, उचलुन घेत कडेवर

म्हणे त्रासुनी,“ अंवखळ मेला "

फिरतां परतुन घराकडे, ती

सांगे,“ चुकवायची न शाळा        ||१० ||


दंगामस्ती करी अशी जो

सरस्वती रागावे त्याला

शाळेत न जातांच, कसा रे

होशील शहाणा तूं बाळा ?         || ११ ||


शाळेतच शिकविती गुरूजी

वाचन-लेखन करावयाला

शिकून हो रे पुष्कळ मोठ्ठा

हंवें काय यापरतें मजला ? ”      || १२ ||


आज पाहतांना खिडकीतुन

बाहेरिल कुंद पावसाळा

बोंट घंरायाला आई चें

उचले नकळत हात बावळा !!     || १३ ||


झालो ना गें अतां शहाणा ? ’

सत्तरीत, हें विचारायला

लावी ' रिम झिम ' शल्य जिव्हारीं

कुठून आणूं मी आई ला ?          || १४ ||



-- रविशंकर.

४ ऑगस्ट २०२४.


No comments:

Post a Comment