'नव्वदी' च्या दशकात, एक
घडला इथं चमत्कार
मुक्त अर्थव्यवस्था
उत्पादकता गारेगार !! ॥ १ ॥
उच्चशिक्षित ही फिरले
नोकर्या शोंधत दारोंदार
'बी. पी. ओं.' च्या 'हमाली' त
मात्र, वेतन तीस हजार !! ॥ २ ॥
,"यू. एस्. मॅन...आय. टी. यार
चंगळबाजी अपरंपार "
फांटक्या जीन्स्-विटके टॉप्स्
किंमत फक्त दहा हजार !! ॥ ३ ॥
शिक्षणसंस्था पडल्या ओंस
'फाड् फाड् विंग्लिश क्लास' हजार
'विद्या' गेली वनवासांत
फुलला 'पोपटां' चा बाजार !! ॥ ४ ॥
बिनलायकीच्या पैश्या चा
पाऊस पडला धुवॉंधार
'स्पेण्डिंग् स्प्री' च्या संवयी नं
अंग धरलं बाळसेदार !! ॥ ५ ॥
नाष्ट्याला 'मॅक. डी. बर्गर'
जेवणासाठी 'चोकोबार'
सायंकाळीं 'कुरकुरे' च
रात्रीं 'मॅग्गी' चा आहार !! ॥ ६ ॥
व्यापार्यांनी अचूक हेंरला
पढतमूर्खांचा अवतार !!
डॉलर नी रुपया मधला
'पासष्टा' चा गुणाकार ॥ ६ ॥
चैन-चंगळीच्याच वस्तूं
विकूं लागले दुकानदार
'पादत्राणं-कपडे-डी.ओ.-
- कॉस्मेटिक्स्' चा जयजयकार !! ॥ ७ ॥
बघून 'आय. टी. बहाद्दरां' ची
बिनडोंक उधळपट्टी, पार
एका रात्रीं त शहाणे झाले
तमाम बारा बलुतेदार !! ॥ ८ ॥
'मजूर' मागे रोंज पांचशे
'अर्ध कुशल' एक हजार
'कुशल' पंधराशे घेई
'कारागीर' दोन हजार !! ॥ ९ ॥
बघतां बघतां 'डोश्या' नं
'शंभरी' ही केली पार
कटिंग् चहा-रुपये दहा
,"घ्या, नाहीतर व्हा पसार !!" ॥ १० ॥
'क्रेडिट कार्डां' वर कर्जं
करून ठेंवलीत, बेसुमार
दिवसा आड देतोंय् काय
आतां वाढवून कोण, पगार? !! ॥ ११ ॥
महामन्दी नं, जगभंर
माजवलाहे हाःहाःकार
'आय. टी.' चं घोडं बसलं
'पोशिंदे' झाले बेजार !! ॥ १२ ॥
'सुहास्य वदने पिंक मेमो'
चोंवीस तासांत तडीपार !!
काम गेलं-दाम गेलं
डोंळ्यांसमोर अंधःकार ॥ १३ ॥
विद्या नाही, कला नाही,
कौशल्याची मारामार
कोण ठेंवून घेईल, असले
नर्मदेतले गोटे, ठार? ॥ १४ ॥
'होम क्वारन्टाईन' मध्ये
फक्त 'मोबी' चा आधार !!
'कॉपी-पेस्ट' शिवाय, कांही
केलंच नाही...काय करणार? ॥ १५ ॥
पैश्याला पासरी, हमाल
आणतां येतीलही उधार
पण, मिळतील काय कुठं
यांच्यासारखे जहागीरदार? !! ॥ १६ ॥
," सो व्हॉट्?, आम्ही जन्मतः च
देशावर केले उपकार !
आमची चिंता वहायला
आहे की, भारत सरकार !! " ॥ १७ ॥
' बाबानों, आतां तरी
मागचा-पुढचा करा विचार
तंरून जायचं असेल, तर
गांठा 'विद्ये' चा दरबार !!! ' ॥ १८ ॥
*******************************************************
-- रविशंकर.
९ एप्रिल २०२०.
No comments:
Post a Comment