मित्र हो, नमस्कार.


"यज्ञकुण्ड अनुभूतीचे, धगधगून फुलले होते
चेहरे नव्या सृजनांचे, ज्वाळांत उजळले होते
मी, हवि शब्द-शब्दाचा अर्पितांच, कांतरवेळीं
दशदिशांत उन्मेषांचे, स्फुल्लिंग उधळले होते " !!

----- रविशंकर.
९ डिसेंबर २००८.

Wednesday, December 17, 2008

॥ खेळिया ॥



डोंळ्यांतलं दंव आतां, गालीं ओंघळत नाही
बाळपण कुठं गेलं? माझं मलाच कळत नाही !! ॥१॥

आंवळ्याचा भाव करून, मी कोहळा उकळत नाही
बायकोचं म्हणणं, मला व्यवहार मुळीच कळत नाही ! ॥२॥

"बाप झाले तरी 'ह्यां'चं, माझ्याशीच जुळत नाही !
सोळा सोमवार केले, पण व्रत कांही फळत नाही" !! ॥३॥

'बायकोपेक्षा मेव्हणी बरी' म्हणत, मी खिदळत नाही
'हि' ची खात्री, सरडा कांही कुंपण तोंडून पळत नाही !! ॥४॥

खाउन पिउन सुखी, पण नोटांची चळत नाही !
एक तारखेवरचं लक्ष्य, तसूंभरही ढळत नाही !! ॥५॥

पोक्त झालेलं रक्त तापतं, पण उसळत नाही
अंगातला वांडपणा, धमन्यांत सळसळत नाही !! ॥६॥

'प्रौढपणा' हाच काय?, नक्की आकळत नाही !
परिपक्वपणाचं, मी दळण कधी दळत नाही !! ॥७॥

जिव्हारीचा घांवसुद्धां, हल्ली भळभळत नाही !
पापड मोडून गेला तरी, गोड बोलणं टळत नाही !! ॥८॥

चेहर्‍यावरचा मुखवटा, मेण असून वितळत नाही !
निरागसपणा आतां, मागूनही मिळत नाही !! ॥९॥

'हूडपणा करूं नये', कळतं, पण वळत नाही
लोकापवादाची जाणीव, स्वप्नांतही छळत नाही !! ॥१०॥

पोरांच्यांत एक बरं, 'फाटतं, पण चिघळत नाही' !
एकदां रड्डी खाल्ली की, भिडूसुद्धा हिंगळत नाही !! ॥११॥

सुंभाचा पीळ, कधी सुखासुखी जळत नाही !!
म्हणून माझ्यापरी कुणी, पोरांटोरांत खेंळत नाही !!! ॥१२॥


****************
---- रविशंकर.
१९ मे २००४.

No comments:

Post a Comment