|| लाडके तात्या ||
' लाडके तात्या ' योजने चे
सरकारी सूप वाजले
' दादां ' चे अफाट यश
वृत्तपत्रीं खूप गाजले || १ ||
उंडगे-सुंडगे कार्यकर्ते
दशदिशांत सुसाट सुटले
रस्तोंरस्तीं - गल्लोगल्लीं
‘ तात्यां ' चे पेंव फुटले !! || २ ||
दादा-भाऊं चे पंटर
रांगांत लगोलग घुसले
‘ वर गेलेले तात्या ' ही
पहिला नंबर लावून बसले !! || ३ ||
‘ जन्म-मृत्यू ' दाखलेवाले
' खाडाखोड्यां ' करून भागले
आक्का-ताई-माईं चे ही
‘ तात्या ' संगे लग्न लागले !! || ४ ||
' बी. पी. एल. ’ दाखलेवाले
बक्कळ मालामाल झाले
बंगलेवाले ' गुंठामंत्री '
रातोंरात कंगाल झाले !! || ५ ||
' नाना-अप्पा-दादा ' च काय
‘ मावश्यां ' चे ही ' तात्या ' झाले
' खरे तात्या ' खेटे घालून
भिजलेल्या चपात्या झाले !! || ६ ||
दिवाळी ला बाजारातनं
डाळी-तेल गडप झाले
रांगा लावून, लाटलेले
उलट पावलीं हडप झाले !! || ७ ||
‘ आमचे तात्या ' कपाळाला
हात लावून बसले आहेत
उखळ पांढरं करून घ्यायचे
उपाय, त्यांना दिसले आहेत !! || ८ ||
‘ तात्या ' आतां अक्कल शिकून
नाव बदलून घेणार आहेत
पुढच्या निवडणुकीआधी
‘ लाडके नाना ' येणार आहेत !!! || ९ ||
-- रविशंकर.
१५ ऑगस्ट २०२४.